Whats new

प्रदूषणाचा उच्चांक

धोक्याची पातळी ओलांडली : औद्योगिक पट्ट्यातील औरंगाबाद, नवी मुंबई, डोंबिवली आणि चंद्रपूरचा समावेश. मुंबई शहरातील जीवनमान अधिक सुखकारक व्हावे, यासाठी ‘स्मार्ट सिटी’ची संकल्पना राबविण्याचा संकल्प केंद्र आणि राज्य सरकारने सोडलेला असतानाच औद्योगिक विभागातील औरंगाबाद, नवी मुंबई, डोंबिवली आणि चंद्रपूर या चार शहरांनी प्रदूषणाची धोकादायक पातळी ओलांडल्यामुळे या शहरांचा विकास ठप्प होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

केंद्रीय पर्यावरण विभागाने केलेल्या सर्वेक्षणानुसार देभरातील ८८ औद्योगिक क्लस्टर्सचा अभ्यास केला गेला. त्यापैकी ४३ क्लस्टर्स प्रदूषणाच्या बाबतीत अतिसंवेदनशील (क्रिटिकली पोल्युटेड एरिया) म्हणून घोषित केले गेले. त्यात महाराष्ट्रातील वरील चार औद्योगिक विभागांचा समावेश आहे. सर्वंकष प्रदूषण निर्देशांकानुसार (कॉम्प्रेहेन्सिव्ह एन्व्हायरमेंटल पोल्युशन इंडेक्स) चंद्रपूरचे गुण ८० हून अधिक आहेत, तर त्या खालोखाल औरंगाबादचे ७७.४४ एवढे गुण आहेत.

नवी मुंबई आणि डोंबिवली शहराचे गुणही ७६ ते ७७ आहेत. पन्नासहून अधिक निर्देशांक असलेली शहरं प्रदूषणाच्या बाबतीत धोकादायक समजली जातात. प्रदूषणाची धोकादायक पातळी ओलांडलेल्या या शहरांना प्रदूषण कमी करण्याबाबत कृती आराखडा देण्यात आलेला होता. दूषित हवा, कचरा प्रकल्प, केमिकल्सची विल्हेवाट लावण्याचे प्रकल्प तत्काळ हाती घेण्याचे बंधन घातले गेले.