Whats new

विष्णुपूर होणार पहिले वारसा शहर

मध्ययुगातील टेराकोट्टा मंदिरासाठी प्रसिद्ध असलेले आणि देदीप्यमान ऐतिहासिक परंपरा लाभलेले पश्‍चिम बंगालमधील विष्णुपूर या शहराला वारसा शहराचा दर्जा दिला जाणार आहे. विष्णुपूर हे शहर आकाराने लहान आहे. आम्हाला ते आणखी मोठे करायचे आहे. त्यामुळेच आम्ही त्याला वारसा शहराचा दर्जा देण्याचा निर्णय घेतल्याचे पश्‍चिम बंगालच्या पुराणवस्तू संग्रहालयाचे अतिरिक्‍त संचालक प्रभाकर पाल यांनी सांगितले. काही दिवसांपूर्वी राज्य सरकारनेच या विष्णुपूरला वारसा शहराचा दर्जा दिला जावा, अशी शिफारस केंद्राकडे केली होती. त्याला आता मान्यता देण्यात आल्याचे पाल यांनी नमूद केले. राज्याचे पर्यटन आणि नगरविकास मंत्रालयाच्या सहकार्याने या शहराला नवा लुक दिला जाईल. येथील पायाभूत सुविधांच्या उभारणीबरोबरच संग्रहालय, पार्क आणि हॉटेल्स यांच्या उभारणीसही महत्त्व देण्यात येईल. या शहरामधील पायाभूत सुविधांच्या विकासाबरोबरच ऐतिहासिक स्थळांच्या संवर्धनासाठी चौदाव्या वित्त आयोगाकडून अतिरिक्‍त निधी मागविण्यात आला आहे. 
ऐतिहासिक महत्त्व 
बांकुरा जिल्ह्यातील विष्णुपूर हे शहर कोलकत्यापासून दीडशे किलोमीटर अंतरावर असून, मल्ल राजवटीमध्ये सतराव्या आणि अठराव्या शतकात येथे प्रसिद्ध टेराकोट्टा मंदिराची उभारणी करण्यात आली. हे शहर बालीचारी साड्या, टेराकोट्टा खेळण्या आणि बांकुराकालीन घोड्याच्या मूर्ती यांच्यासाठी प्रसिद्ध आहे. येथील मल्ल राज्यकर्ते संगीत कलेचे आश्रयदाते म्हणून ओळखले जात. कधीकाळी येथील विष्णुपूर घराण्याचा संगीत क्षेत्रामध्ये मोठा दबदबा होता.