Whats new

युरोपात नवा देश : लिबरलँड

 

जगाच्या पाठीवर एका नव्या देशाचा जन्म झाला आहे. त्याचे नाव आहे, लिबरलँड. या देशाचा विस्तार अवघा सात किलोमीटर आहे. अजूनही त्याला आंतरराष्ट्रीय समुदायाची मान्यता मिळालेली नाही. मात्र, सध्या अनेक कारणांनी हा देश चर्चेत आहे. आम्ही नागरिकांवर कोणताही कर लादणार नाही. किती कर द्यायचा हे लोकांनी स्वतःच ठरवावे, असे तेथील प्रशासनाने जाहीर केले आहे. 
विट जेडलिका चेक प्रजासत्ताकात कन्झर्व्हेटिव्ह पार्टी फॉर फ्री सिटीझन या पक्षाचे सदस्य आहेत. तेथील स्थानिक राजकारणात ते नेहमी करमुक्त कायद्याचा पुरस्कार करीत. तेव्हा गंमतीने त्यांना नवा देश स्थापन करण्याचा सल्ला अनेकांनी दिला. मात्र, ती बाब जेडलिका यांनी गांभीर्याने घेतली. आपल्या देशाच्या शेजारीच बिनामालकीचा भूभाग असल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यानंतर त्यांनी तेथे देश स्थापन करण्याची घोषणा केली. त्यांनी स्वतःला या देशाचे राष्ट्रपती म्हणून घोषित केले आहे. तूर्त क्रोएशिया आणि सर्बिया या दोन्ही देशांनी लिबरलँडमधून आपल्या देशात ये-जा बंद केली आहे. 
जेडलिका यांनी सुरुवातीला फक्त पाच हजार लोकांनाच लिबरलँडचे नागरिक बनण्यासाठी आमंत्रित केले होते. मात्र, ऑनलाइन अर्ज मागविण्यात आल्यानंतर इच्छुकांची संख्या १.६० लाखांवर पोहोचली. सध्या ती अडीच लाखांवर गेली आहे. लिबरलँडच्या अधिकृत वेबसाइटवर उल्लेख केल्याप्रमाणे कम्युनिस्ट, नाझी आणि मूलतत्त्ववादी सोडून कोणीही लिबरलँडचे नागरिकत्व घेऊ शकतो. 
नवा देश निर्माण करण्यासाठी चार गोष्टी आवश्यक असतात. एक निश्चित सीमारेषा, नागरिक, सुनियंत्रित सरकार आणि आंतरराष्ट्रीय मान्यता. सध्या कोणत्याही देशाने लिबरलँडला मान्यता दिलेली नाही. मात्र, नॉर्वेने या भागाला नवा देश बनविण्याचे समर्थने केले आहे. ऑस्ट्रियामध्येही या विषय़ावर अनुकूल मत आहे. 
सध्या हा देश केवळ प्रतीकात्मक आहे. तसेच, राष्ट्रपती विट जेडलिका यांना क्रोएशियाने दोन वेळा स्वघोषित देशात प्रवेश केल्याबद्दल अटकही केली आहे. लवकरच ऑनलाइन निवडणूक घेऊन एक सरकार निवडले जाईल, असे जेडलिका यांनी म्हटले आहे.
कुठे आहे लिबरलँड? 
सर्बिया आणि क्रोएशिया यांच्या दरम्यान सात किलोमीटरचा भूखंड आहे. दोन्ही देश त्याला आपला भूभाग मानतनाहीत. त्यामुळे चेक प्रजासत्ताकाचा नागरिक असलेल्या विट जेडलिका नावाच्या व्यक्तीने १३ एप्रिल २०१५ रोजी या भूभागाला स्वतंत्र देश म्हणून घोषित केले. त्यानेच या देशाचे नामकरण लिबरलँड असे केले. या देशाचे ब्रीदवाक्य आहे, जगा आणि जगू द्या. क्षेत्रफळाच्या दृष्टीने हा कथित देश व्हॅटिकन सिटी आणि मोनॅको या देशांपेक्षा मोठा आहे.

< < Prev Next >>