Whats new

मराठमोळ्या नीरजची ‘कान’पताका

चित्रपट दिग्दर्शनाच्या पहिल्याच प्रयत्नात दिग्दर्शकाला अपेक्षा असते ती प्रेक्षकांच्या पसंतीची, पोचपावतीची. लोकांनी सिनेमा बघायला चित्रपटगृहात यावे, यासाठी त्यांचे प्रयत्न असतात. मात्र, पहिल्याच प्रयत्नात जगभरातील दर्दींची दाद आणि 'कान'सारख्या अत्यंत प्रतिष्ठित सोहळ्यात पुरस्कारांसह पसंतीची पावती मिळवण्याचा पराक्रम नीरज घायवान या मराठी दिग्दर्शकाने त्याच्या 'मसान' या हिंदी चित्रपटाद्वारे केला आहे. अत्यंत मानाच्या समजल्या जाणाऱ्या 'फिप्रेसी' या इंटरनॅशनल ज्युरी ऑफ फिल्म क्रिटिक्स या गौरवासह दिग्दर्शक नीरजला 'अनसर्टन रिगार्ड' विभागातील 'आश्वासक दिग्दर्शक' या मानाच्या पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले. कानमध्ये 'मसान' बघितलेल्या प्रत्येकाने सिनेमाचे कौतुक केले आहे. स्पर्धेत असलेल्या इतर १९ सिनेमांमधून नऊ परीक्षांनी 'मसान'ची सर्वोत्कृष्ट सिनेमासाठी निवड केली. हा पुरस्कार मिळवणारा नीरज हा पहिला भारतीय दिग्दर्शक ठरला आहे.