Whats new

बूटासाठी पैसे नसतानाही मनदीपने जिंकले सुवर्णपदक

मनदीप संधू नावाच्या मुलीला एकेकाळी बूट खरेदी करण्यासाठीही पैसे नव्हते, मात्र तिने कनिष्ठ गटातील महिलांच्या जागतिक मुष्टियुद्ध स्पर्धेत सुवर्णपदक पटकावत परिस्थितीवर मात करून पुढे जाण्याचा नवा आदर्शवाद निर्माण केला आहे. 
तैवानची राजधानी असलेल्या ताइपेइ येथे महिलांच्या 52 किलो वजनाच्या कनिष्ठ गटात मनदीपने सुवर्णपदक पटकावले आहे. मनदीप पंजाबमधील चाकर या गावतील आहे. ज्यावेळी मनदीपला बॉक्‍सिंगमध्ये जावेसे वाटले तो दिवस अद्यापही आठवत असल्याचे तिच्या वडिलांनी सांगितले. त्यांच्याकडे केवळ 1 एकर जमीन आणि वार्षिक 20 हजार रुपये उत्पन्न होते. त्यावेळी मनदीप सात वर्षांची होती. तिला प्रशिक्षण केंद्रातून पहिल्यांदा बूट मिळाले, असेही तिच्या वडिलांनी यावेळी बोलताना सांगितले आहे. प्रबळ इच्छाशक्तीमुळे गावातील पंचायतीसमोर तिचा मुद्दा आला.त्यावेळी पंचायतीसोबत काम करणाऱ्या दोन अनिवासी भारतीय चालवित असलेल्या स्थानिक अकादमीने तिला सहकार्य केले. ज्यावेळी मनदीपने पहिल्यांदा राष्ट्रीय पदक जिंकले त्यावेळी पंचायतीने तिला 1,100 रुपयांचा पुरस्कार दिला. तो पुरस्कार म्हणजे आमच्यासाठी लॉटरीच होती असेही तिच्या वडिलांनी सांगितले. अजमेर सिंग आणि स्व.बलदेव सिंग दोन अनिवासी भारतीयांच्या शेर-ए-पंजाब या बॉक्‍सिंग अकादमीत तिने प्रशिक्षण घेतले. त्यावेळी तिच्या खर्चासाठी या दोन भावांनीच तिला वेळोवेळी तिला आर्थिक मदत केल्याचेही तिच्या वडिलांनी सांगितले.