Whats new

2015 ‘सर्वाधिक उष्ण’ वर्ष म्हणून ओळखले जाणार

या वर्षी प्रचंड उकाडा सहन करण्याची ताकद ठेवा कारण 2015 हे वर्ष ‘सर्वाधिक उष्ण’ वर्ष म्हणून ओळखले जाणार आहे. जानेवारी ते एप्रिलपर्यंतचे महिने जगातील सर्वात उष्णतेचे महिने ठरले आहेत. अंटार्क्टिका, घाना, व्हेनेजुएला आणि लाओससहित अनेक भागात तापमानाचे 135 वर्षाचे रेकॉर्ड तोडले गेले आहेत. अमेरिकेच्या ओशनिक हवामान विभागाने ही माहिती दिली आहे.

एल-निनो आणि ग्लोबल वॉर्मिंगचा परिणाम

मार्च 2015 पासून जागतिक कार्बन उत्सर्जनामध्ये पहिल्यांदाच 400 पीपीएम इतक्या मोठय़ा प्रमाणात वाढ झाली आहे. यामुळे समुद्राकडून तापमान कमी होण्याचा वेग मंदावला आहे. हे तापमान वाढीचे प्रमुख कारण सांगितले जात आहे. याचबरोबर एल-निनो या गरम हवेच्या प्रवाहाने प्रशांत महासागरात गती पकडली असून यामुळे समुद्राच्या थंड पाण्यावर गरम वाहणाऱया हवेच्या प्रवाहाचा परिणाम झाला आहे. यामुळे पाणी पृष्ठभागाकडे ओढले जाण्याच्या प्रकियेत अडथळा निर्माण होत आहे. याचा एकत्रित परिणाम तापमानवाढीवर होत आहे.

जलचरांना बसणार सर्वात मोठा फटका

उकाडा असल्यामुळे पाणी साठे संपण्याच्या मार्गावर असून पुढील काळात काही भागांना मोठय़ा दुष्काळाला तर काही भागांना मोठय़ा महापुरांना सामोरे जावे लागणार आहे. याचमुळे अनेक देशात महागाईमध्ये वाढ होणार असून त्याचे प्रमाण 107 टक्के इतके प्रचंड आहे. पश्मिमी देशात मोठय़ा प्रमाणात पाऊस आणि वादळाची शक्यता आहे. तसेच समुद्राच्या थंड पाण्यावर गरम हवेचा प्रभाव असल्याने त्याचा सर्वात मोठा फटका समुद्रातील जलचरांना बसणार आहे.

0.80 अंश सेल्सिअस तापमानाची वाढ

चालु वर्षी 0.80 अंश तापमानची वाढ झाली असून ही वाढ 20 व्या शतकातील सर्वात मोठी वाढ ठरली आहे. संशोधकांनी ही वाढ 0.64 अंश सेल्सिअस पर्यत होईल असे म्हटले होते. मात्र ग्लोबल वॉर्मिंगमुळे ही वाढ झाली आहे. अंटार्क्टिकामध्ये यावर्षी 14 मार्चला सर्वाधिक 17.4 अंश तापमानाची नोंद झाली असून बर्फ वितळण्याचे प्रमाण मोठय़ा प्रमाणात वाढले आहे.

जगातील सर्वाधिक तापमानाची नोंद कॅलीफोर्नियामध्ये

जगात सर्वाधिक तापमानाची नोंद कॅलीफोर्नियामध्ये 10 जुलै 1913 ला झाली असून त्यावेळी 56.7 अंश तापमानाची नोंद झाली होती. आशियामध्ये सर्वाधिक  53.5 अंश सेल्सिअस ही तापमान नोंद पाकिस्तानमध्ये 2010 साली झाली आहे. भारतात 50.6 या सर्वाधिक तापमानाची नोंद राज्यस्थानमधील अलवरमध्ये करण्यात आली आहे. दिल्लीमध्ये 8 जून 2014 ला 62 वर्षाचा रेकॉर्ड तोडून 47.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती.