Whats new

"स्पेलिंग बी'मध्ये पुन्हा भारताचा झेंडा

सलग दुसऱ्यांदा "स्क्रिप्स नॅशनल स्पेलिंग बी‘ या स्पर्धेत भारताने आपला झेंडा फडकावला असून, वान्या शिवशंकर (वय 13) आणि गोकूळ व्यंकटचलम (वय 14) या दोन चिमुरड्यांनी या स्पर्धेत बाजी मारली आहे. या दोघांनाही सहविजेते घोषित करण्यात आले. सुवर्णचषक आणि 37 हजार डॉलरचा रोख असा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला. या स्पर्धेत दोन लहान मुले सहविजेते ठरण्याची पहिलीच वेळ आहे. या स्पर्धेतील तिसरे स्थानदेखील भारतीय-अमेरिकी वंशाच्या कोल शेफर-रे या ओकाहोमा मधील मुलाने पटकावले. 

वान्या शिवशंकर म्हणाली की, "खूप दिवसापासूनचे हे माझे स्वप्न होते. आता ते प्रत्यक्षात साकार झाले आहे.‘‘ विशेष म्हणजे वान्याची बहीण काव्यानेदेखील 2009 मध्ये या स्पर्धेत बाजी मारली होती. वान्याने हे यश तिच्या आजीला अर्पण केले असून, मागील आक्‍टोबर महिन्यातच तिच्या आजीचे निधन झाले होते. कन्सास प्रांतामध्ये राहणाऱ्या वान्याने cytopoiesis, bouquetiere आणि thamakau या इंग्रजी शब्दांचे योग्य स्पेलिंग सांगत सुवर्ण चषकावर आपले नाव कोरले. व्यंकटचलम यानेही अनेक अवघड इंग्रजी शब्दांचे स्पेलिंग अगदी बिनचूक सांगितले. अमेरिकेच्या एकूण लोकसंख्येशी तुलना करता अनिवासी भारतीयांची लोकसंख्या केवळ 1 टक्‍के एवढी आहे. पण या स्पर्धेमध्ये पूर्वीपासून असलेले अनिवासी भारतीयांचे वर्चस्व या वर्षीही कायम राहिले.