Whats new

आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघाच्या (फिफा) अध्यक्षपदी सॅप ब्लाटर यांची पाचव्यांदा निवड

वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघाच्या (फिफा) अध्यक्षपदी सॅप ब्लाटर यांची पाचव्यांदा निवड झाली आहे. जॉर्डनचे प्रिन्स अली बिन अल हुसेन यांनी दुसऱ्या फेरीपूर्वी माघार घेतली.

स्वित्झर्लंडमधील झुरिच शहरात झालेल्या या निवडणुकीकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले होते. गेल्या दोन दिवसांपासून भ्रष्टाचार आणि लाचखोरी प्रकरणात फिफा गाजत होती. झालेल्या निवडणुकीत पहिल्या फेरीत ब्लाटर यांना १३३ तर प्रिन्स अली यांना ७३ मते पडली. ७९ वर्षीय ब्लाटर यांना पूर्ण बहुमतासाठी पहिल्या फेरीत १४० मतांची आवश्यकता होती. पण ही त्यांची संख्या पूर्ण न झाल्याने दुसरी फेरी होणार हे नक्की झाले होते. पण दुसरी फेरी सुरू होण्यापूर्वीच प्रिन्स अली यांनी माघार घेतली आणि ब्लाटर हे पाचव्यांदा जगातील सर्वात श्रीमंत असलेल्या क्रीडा संस्थेच्या अध्यक्षपदी पुन्हा विराजमान झाले.

या निवडणुकीमध्ये आफ्रिका विभागाचे ५४, युरोप विभागाचे ५३, एशिया विभागाचे ४६, नॉर्थ व सेंट्रल अमेरिकचे ३५, ओसेनियाचे ११ व साऊथ अमेरिकेचे १० असे एकूण २०९ मते होती. मतदान सुरू होण्यापूर्वी युरोपीयन देशांनी आपली ५३ मते तर आस्ट्रेलियाने आपले मत प्रिन्स अली यांना देणार असल्याचे जाहीर केले होते. तर दुसरीकडे आफ्रिकन आणि एशियन विभागाच्या अधिकाऱ्यांनी आम्ही ब्लाटर यांना मतदान करणार असे सांगितले होते. याचबरोबर न्यूझीलंड, कॅनडा, अमेरिका या दिग्गज देशांनी सुद्धा ब्लाटरविरोधात मतदान करणार असल्याची घोषणा केली होती.