Whats new

पाचशे, हजारांची नोट आता देशी कागदावरच

हजार आणि पाचशे रुपयांच्या नोटा आता देशातील कागदांवरच छापण्यात येणार आहेत. केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी मध्य प्रदेशातील होशंगाबाद इथं, नोटांसाठी तयार होणाऱ्या पेपर युनीटचं उद्घाटन केलं.

यानंतर यातील खास पेपरचा पहिला गठ्ठा नाशिकला रवाना करण्यात आला. नाशिकमध्ये या पाचशे आणि हजार रुपयांच्या स्वदेशी नोटा छापण्यात येतील.

 आता परदेशातील कागद आयात बंद

आतापर्यंत या मोठ्या नोटा परदेशातून आयात केलेल्या कागदावर छापण्यात येत होत्या. हा कागद आयात करण्यासाठी सरकारचा मोठ्या प्रमाणात खर्च होतो. हा खर्च कमी करण्यासाठी सरकारने देशी कागदावरच नोटा छापण्याचा निर्णय घेतला आहे. सुमारे 500 कोटी रुपयांचं हे कागद बनवणारं युनीट आहे. या युनीटमध्ये वर्षाला सुमारे दहा हजार टन चांगला कागदनिर्मित होऊ शकेल.

 थ्री डी वॉटर मार्क कागद

हा कागद थ्री डी वॉटर मार्क बँक नोट कागद असेल, ज्याची देशातील मागणी 25 हजार मेट्रीक टन आहे. मात्र सध्या देशात त्याचं उत्पादन खूपच कमी आहे. नव्या युनीटमध्ये ही कमतरता भरून निघेल अशी आशा आहे.

 नोटांवरील चिन्हंही भारतातच

यापूर्वी कागद आयात केल्यामुळे सरकारचा खर्च होत असे. तसंच  नोटांवरील सुरक्षीत चिन्हं ही सुद्धा कागदांनुसार बनवावी लागत होती. मात्र आता ही सुरक्षा चिन्हंही कागदानुसार भारतातच बनवली जातील. यामुळे बनावट नोटांवरही प्रतिबंध येईल, असं जेटली म्हणाले. देशातील कागदावरच नोटा छापणं, हा ‘मेक इन इंडिया’चा भाग असल्याचं जेटलींनी नमूद केलं.