Whats new

‘वन रँक वन पेन्शन’ म्हणजे काय?

जवान आपल्या प्राणांची बाजी लावून देशाची सेवा करतात. मात्र, निवृत्तीनंतरच्या आयुष्यात त्यांना अत्यंत हलाखीचे जीवन जगावं लागतं... जगण्यासाठी त्यांना संघर्ष करावा लागतो. त्यामुळे अशा सैनिकांना पेन्शन हे एकमेव आधार ठरतं. मात्र, या पेन्शनमध्येही अनेक निवृत्त सैनिकांवर अन्याय होतो. अशा सैनिकांसाठी वन रँक वन पेन्शन’ ही योजना महत्त्वाची ठरु शकते.

वन रँक वन पेन्शन म्हणजे वेगवेगळ्या वर्षी निवृत्त झालेल्या मात्र एकाच रँकच्या सैनिकांच्या पेन्शनच्या रकमेत जास्त फरक नसावा किंबहुना ती रक्कम सारखीच असावी. सध्या परिस्थिती अशी आहे की, आधी निवृत्त झालेल्या एकाच रँकच्या लष्करी अधिकाऱ्याला कमी पेन्शन आणि नंतर निवृत्त झालेल्या त्याच रँकच्या अधिकाऱ्याला जास्त पेन्शन मिळतं.

हे कसं ते आपण एका उदाहरणावरुन पाहूया. 2006 साली निवृत्त झालेल्या मेजर जनरलची पेन्शन 30,300 रुपये आहे, तर आता कुणी कर्नल निवृत्त झाल्यास त्याला 34,000 रुपये पेन्शन मिळते. वस्तुत: मेजर जनरल हा कर्नल पदाच्या दोन रँक वरचा अधिकारी असतो.

एकाच रँकच्या पेन्शनमधील ही असमानता केवळ लष्करी अधिकाऱ्यांपर्यंतच मर्यादित नाही. तर शिपाई, नाईक आणि हवालदार रँकचे सैनिकही या असमानतेला बळी पडले आहेत.

वन रँक वन पेन्शन म्हणजे सेवानिवृत्त सैनिकांना आता समान पेन्शन असेल. देशात दरवर्षी सुमारे 65 हजार सैनिक निवृत्त होतात. म्हणजेच देशात या घडीला 25 लाख निवृत्त सैनिक आहेत.