Whats new

चीनमध्ये चेहरा ओळखणारे एटीएम तंत्रज्ञान

चीनच्या संशोधकांनी प्रथमच चेहरा पाहून माणसाची ओळख पटवणारे एटीएम यंत्र तयार केले आहे. त्यामुळे एटीएम यंत्रांवर दरोडे पडण्याची जोखीम कमी होईल. तिंगशुआ विद्यापीठ व हांगझाऊची झेकवान टेक्नॉलॉजी कंपनी यांनी हे यंत्र तयार केले आहे. त्यात आर्थिक व्यवहारांना संरक्षण मिळाले आहे असे साऊथ चायना मॉर्निग पोस्ट या वृत्तपत्राने म्हटले आहे.
झेकवानचे अध्यक्ष ग्यू झिकून यांनी सांगितले की, या नव्या एटीएममुळे आर्थिक गुन्हे कमी होतील. चीनमध्ये सध्या आयात केलेले एटीएम तंत्रज्ञान वापरले जाते पण नवीन यंत्रे नोटा अधिक वेगाने हाताळू शकतात, खोटय़ा नोटा ओळखू शकतात व पैसे काढायला आलेल्याचा चेहरा ओळखू शकतात. हे तंत्रज्ञान संपूर्ण चिनी आहे. ह्य़ू यांच्या या उत्पादनास अधिकाऱ्यांनी प्रमाणित केले असून हे एटीएम यंत्र लवकरच बाजारात उपलब्ध होईल. एटीएम यंत्राची प्रत्यक्षात निर्मिती कोण करणार व चेहऱ्यांची माहिती कशी संकलित करणार हे दोन मुद्दे यात अनुत्तरित आहेत. चीनने मेड इन चायना उपक्रम राबवला असून नंतर लगेचच या नवीन स्वदेशी तंत्रज्ञानाची घोषणा चीनने केली आहे. येत्या दहा वर्षांत चीनला उच्च दर्जाच्या व कमी किमतीच्या अशा सर्व प्रकारच्या वस्तूंच्या उत्पादनात आघाडीवर नेण्याचे ठरवण्यात आले आहे.  चिली व कोलंबिया या देशांमध्ये बोटांचे ठसे ओळखणारी एटीएम यंत्रे आहेत. काही देशात बायोमेट्रिक यंत्रे वापरली जात नाहीत त्यात अमेरिकेचा समावेश आहे कारण त्यात व्यक्तीगतता राहत नाही. चीनची नवीन एटीएम यंत्रे देशातील बँकांना व सुरक्षा यंत्रणांना जोडली जाऊ शकतील व त्यामुळे ज्याच्याकडे डेबिट कार्ड असेल तोच पैसे काढू शकेल. जरी दुसऱ्याला पासवर्ड माहिती असला तरी त्याला पैसे काढता येणार नाहीत. या तंत्रज्ञानाच्या विरोधकांनी व्यक्तीगततेचा मुद्दा उपस्थित केला असून ऑनलाईन अचूकतेवर शंका घेतल्या आहेत. जर कुणाची प्लास्टिक सर्जरी झाली असेल तर चेहरा कसा ओळखणार कारण एखादी व्यक्ती तिचा चेहरा अलिबाबाचे संस्थापक जॅक मा यांच्यासारखा करू शकतो.