Whats new

भूम- परंडा देशातले पहिले 'ई-लर्निंग' तालुके

 

युवकांनी साकारला प्रकल्प; जिल्हा परिषदेच्या शाळा जोडल्या

कायम दुष्काळाच्या दुष्टचक्रात अडकेल्या भूम आणि परांडा या तालुक्‍यांत आधुनिक तंत्रज्ञानाच्या शिक्षणाची क्रांती करण्याचा पराक्रम झपाटलेल्या युवकांनी करून दाखवला आहे. सुरवातीला परांडा आणि आता भूम या दोन्ही तालुक्‍यांतील जिल्हा परिषदेच्या सर्व शाळा "ई-लर्निंग‘ने जोडल्या आहेत. अशाप्रकारे जिल्हा परिषदेच्या शाळांत शंभर टक्‍के "ई-लर्निंग‘ची सुविधा देण्याचा मान परांडा आणि भूमने पटकावला आहे. देशातला पहिला यशस्वी प्रयोग म्हणून या दोन्ही तालुक्‍यांनी बाजी मारली आहे.
जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकल्यानंतर शहरात उद्योजक बनलेल्या तसेच नोकरी करणाऱ्या युवकांनी मातृभूमीच्या प्रेमापोटी हा उपक्रम राबवला आहे. सर्वच क्षेत्रांत पिछाडीवर असलेल्या या दोन्ही तालुक्‍यांत शिक्षणाची स्थिती बेताचीच आहे. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत जिल्हा परिषदेच्या शाळेतून अनेकांनी शिक्षण घेतले, त्यातले काहीजण उद्योजक झाले. काहीजण "इन्फोसिस‘सारख्या नामांकित कंपनीत नोकरीला लागले. या तालुक्‍यातल्या शिक्षणाची स्थिती बदलण्याचा निर्धार करत उद्योजक गोरख कातुरे आणि संगणक विशारद नितीन मांजरे यांनी पुढाकार घेतला. त्यातून "जीडीपी फाउंडेशन‘चा जन्म झाला. तीन वर्षांपूर्वी "ई-लर्निंग‘ या उपक्रमाची झालेली सुरवात आज सफल झाली आहे. या दोन्ही तालुक्‍यांतील जिल्हा परिषदेच्या तब्बल 250 शाळा पूर्णपणे "ई-लर्निंग‘च्या सुविधेने जगाशी जोडल्या आहेत.

"जीडीपी फाउंडेशन‘ हे स्थानिक युवकांचे संघटन आणि ग्रामस्थांच्या सहकार्यातून हा उपक्रम यशस्वी झाला. यासाठी संगणक पुरवठा करण्यासाठी "इन्फोसिस‘ला घातलेले साकडे यशस्वी झाले. ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून प्रोजेक्‍टर व इन्व्हर्टर उपलब्ध करून देण्याचा वाटा उचलला आहे. कोणत्याही सरकारी मदतीशिवाय जिल्हा परिषद शाळाही कात टाकू शकतात, हा संदेश या उपक्रमातून गेला आहे.

‘ई लर्निंग‘ची व्याप्ती...

250 दोन्ही तालुक्‍यांतील झेडपीच्या शाळा

550 संगणकांचे वितरण

20,000 दोन्ही तालुक्‍यांतील विद्यार्थी

< < Prev Next >>