Whats new

इंदरजितसिंगची सोनेरी कामगिरी

भारताच्या इंदरजितसिंग याने रिओ ऑलिम्पिकमधील प्रवेश सार्थ ठरविताना गोळाफेकीत सुवर्णपदक जिंकले आणि वरिष्ठ गटाच्या आशियाई मैदानी स्पर्धेतील पहिल्याच दिवशी भारताचा तिरंगा फडकविला.

इंदरजित याने चौथ्या प्रयत्नात २०.४१ मीटर अंतरापर्यंत गोळाफेक केली. त्याने मंगलोर येथे नुकत्याच झालेल्या फेडरेशन चषक स्पर्धेत २०.६५ मीटर अंतरापर्यंत गोळाफेक केली होती. हरयाणातील रोहतक येथील तो रहिवासी आहे. तो वैश्य महाविद्यालयाचा खेळाडू आहे. २६ वर्षांच्या या खेळाडूने गतवर्षी आशियाई क्रीडा स्पर्धेत कांस्यपदक मिळविले होते तर २०१३ मध्ये त्याने जागतिक आंतरविद्यापीठ स्पर्धेत रौप्यपदक पटकाविले होते.

भारताची ऑलिम्पिकपटू मायुखा जॉनी हिला लांब उडीत सहाव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. तिने ६.२४ मीटपर्यंत उडी मारली. चीनच्या लु मिनजिया हिने ६.५२ मीटर अंतरापर्यंत उडी मारुन सुवर्णपदक जिंकले. १०० मीटर अडथळा शर्यतीत भारताच्या जी. गायत्री हिला सातवे स्थान मिळाले. तिला हे अंतर पार करण्यास १३.८९ सेकंद वेळ लागला. चीनच्या झेई वेनजुन हिने हे अंतर १३.५८ सेकंदात पार करीत सोनेरी कामगिरी केली.