Whats new

एलिट पंच पॅनेलमध्ये भारताचे एस. रवी

एस. वेंकटराघवन यांच्या निवृत्तीनंतर तब्बल ११ वर्षांनी आयसीसीच्या एलिट पॅनेलमध्ये भारतीय पंचाला स्थान मिळाले आहे. आयसीसीने २०१५-१६ या मोसमासाठी अव्वल पंचांची नियुक्ती जाहीर केली. त्यामध्ये तमिळनाडूच्या एस. रवी यांना स्थान मिळाले आहे. यंदा रवी यांच्यासह न्यूझीलंडचे ख्रिस गॅफनी पदार्पण करतील. बिली बॉऊडेन व निवृत्त होणारे स्टीव डेव्हिस यांच्याऐवजी त्यांची निवड झाली आहे. रवी यांनी सहा कसोटीत पंच म्हणून काम पाहिले आहे. यामध्ये नुकत्याच झालेल्या इंग्लंड-न्यूझीलंड मालिकेचा समावेश आहे. तसेच २४ एकदिवसीय (यंदाच्या विश्‍वकरंडक स्पर्धेतील तीन सामने) आणि १२ ट्‌वेन्टी-२० सामन्यांचा त्यांना अनुभव आहे.

पंच समितीचे अध्यक्ष सायमन टॉफेल हे बीसीसीआयच्या पंच समितीचे सल्लागारही आहेत. त्यांनी काही दिवसांपूर्वीच रवी यांचे कौतुक केले होते. देशांतर्गत पंचांचा दर्जा आम्हाला उंचावायचा आहे; त्यातूनच काही वर्षांनंतर पॅनेलसाठी पंच तयार होतील, असे टॉफेल म्हणाले.

असे आहेत एलिट पॅनेलमधील पंच :

आलिम दर (पाकिस्तान), कुमार धर्मसेना (श्रीलंका), मॅरीयूस इरॅस्मस (दक्षिण आफ्रिका), ख्रिस गॅफनी (न्यूझीलंड), इयन गौल्ड, रिचर्ड इलिंगवर्थ, रिचर्ड केटलबर्ग, नायजेल लॉंग (इंग्लंड), एस. रवी (भारत), पॉल रायफेल, रॉड टकर, ब्रूस ऑक्‍सेनफोर्ड (ऑस्ट्रेलिया).