Whats new

विद्यापीठांसाठी पदभरती परिषद

राज्यातील विद्यापीठे आणि संलग्न कॉलेजांमधील प्राध्यापकांच्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पदांची भरती केंद्रीय पद्धतीने करण्यासाठी महाराष्ट्र विद्यापीठ पदभरती परिषद स्थापन करण्याच्या हालचाली कुलपती कार्यालयाकडून सुरू झालेल्या आहेत. कुलगुरू परिषदेत मंजूर झालेल्या या ठरावावर आता राज्यातील विद्यापीठांकडून मते मागवण्यात येत आहेत. ही परिषद स्थापन झाल्यास प्राध्यापक पदभरतीत पारदर्शकता येईल, असे मत व्यक्त होत आहे. 
गेल्या वर्षी मुंबईत झालेले संयुक्त कुलगुरू मंडळ जळगाव विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुधीर मेश्राम यांनी विद्यापीठ व कॉलेजांमधील अध्यापकांच्या पदभरतीसाठी राज्यस्तरीय वा विद्यापीठ पातळीवर केंद्रीय भरती प्रक्रिया सुरू करावी, असा ठराव सादर केला. त्याला कुलपती व शिक्षण मंत्र्यांसह सर्व विद्यापीठांच्या कुलगुरूंनी पाठिंबा दिला. त्या अनुषंगाने कुलपती कार्यालयाने विद्यापीठ पदभरती परिषद स्थापन करण्याबाबत राज्यातील विद्यापीठांच्या कुलगुरूंना अभिप्राय सादर करण्यास कळविले आहे. 
माहिती देताना कुलगुरू डॉ. सुधीर मेश्राम म्हणाले, 'विद्यापीठ संलग्नित अनुदानित व कायम विना अनुदानित कॉलेजांमध्ये अध्यापक नेमणुकीत अनेक गैरप्रकार होतात. अनेकदा पात्र उमेदवार मिळाला नाही म्हणून पदे रिक्त ठेवली जातात. शैक्षणिक संस्थांमध्ये केवळ संस्थाचालकांच्या वारसांना अथवा नातलगांचीच वर्णी लागते. या सर्व प्रकारांना रोखण्यासाठी, तसेच शिक्षण क्षेत्रात गुणवत्ताधारक अध्यापकांची नियुक्ती व्हावी, त्या प्रक्रियेत पारदर्शकता यावी या उद्देशाने ठराव सादर केला होता.' 
राज्यभरातील सर्वच कॉलेजांमधील पदांची एकत्रित भरती झाली, तर विद्यार्थी व शिक्षक यांचे प्रमाणही साधले जाईल. त्यासोबतच नेट व सेट पात्रताधारकांनाही त्वरित संधी मिळेल, असेही डॉ. मेश्राम म्हणाले. या परिषदेच्या माध्यमातून राज्य व विद्यापीठ पातळीवर भरती प्रक्रिया करता येईल. त्यासाठी संबंधित विद्यापीठांचे कुलगुरू अथवा त्यांचे प्रतिनिधी, विषयतज्ज्ञ, व्यवस्थापनाचे प्रतिनिधी व सरकारचे प्रतिनिधी अशी निवड प्रक्रियाही करता येईल. तसेच विविध पदांच्या आरक्षण बिंदूनामावलीचीही (रोस्टर) समस्या त्यामुळे निकालात निघणार आहे. खासगी संस्थांना विद्यापीठांकडे वारंवार पदभरतीसाठी अर्ज करावे लागतात. परंतु, त्यांनी त्यांच्याकडील सर्व पदे केंद्रीय परिषदेकडे पाठवल्यास एकाचवेळी ही पदे भरता येणार आहेत, असे डॉ. मेश्राम म्हणाले.
< < Prev