Whats new

मंगळ मोहिमेला ‘स्पेस पायोनिअर’

अत्यंत कमी खर्चात यशस्वी ठरलेल्या भारताच्या 'मंगळ मोहिमेची' दखल आंतरराष्ट्रीय पातळीवर घेण्यात आली आहे. या मोहिमेला अमेरिकेच्या राष्ट्रीय अवकाश संस्था (एनएसएस) चा २०१५ चा ‘स्पेस पायोनिअर’ पुरस्कार मिळाला आहे. चांदीचा चंद्रगोल असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. 
कॅनडा येथील टोरांटोमध्ये २० ते २४ मे या कालावधीत झालेल्या ३४ व्या आंतरराष्ट्रीय अवकाश विकास परिषदेत हा पुरस्कार 'इस्रो'ला मिळाल्याची माहिती 'इस्रो'च्या वेबसाइटवर प्रसिद्ध झाली आहे. पहिल्याच प्रयत्नात मंगळमोहीम यशस्वीरित्या पार पाडल्याबद्दल, 'इस्रो'ची या वर्षीचा 'स्पेस पायोनिअर' पुरस्कारासाठी ही निवड झाल्याचे नमूद केले आहे. 'एनएसएस' ही स्वयंसेवी शैक्षणिक संस्था आहे. ती अंतराळातील नागरीकरण या क्षेत्रात काम करते. यापूर्वीही संस्थेने ‘इस्त्रो’ ला २००९ मध्ये चांद्रयान-१ मोहिमेबद्दल गौरविले होते. 
इस्रोने गेल्या वर्षी पाच नोव्हेंबर २०१३ रोजी आंध्र प्रदेशमधील श्रीहरिकोटा येथून हे यान प्रक्षेपित केले होते. २४ सप्टेंबर २०१४ रोजी नऊ महिन्यांच्या अथक प्रवासानंतर हे यान यशस्वीपणे मंगळाच्या कक्षेत स्थिरावले. अमेरिका, युरोप या बलाढ्य देशांच्या पंक्तीत आता भारताचे स्थान झाले आहे.