Whats new

'चेक बाऊन्स'प्रकरणी नवा अध्यादेश

 

  चेक जमा केलेल्या ठिकाणीच खटला दाखल होणार

 
 

केंद्र सरकारने आज अध्यादेश जारी करून चेक बाऊन्स पीडितांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. ग्रामीण भागात राहणार्‍या व्यक्तीला जर पुणे किंवा मुंबई सारख्या ठिकाणाहून कुणी चेक दिला आणि तो बाऊन्स झाला तर त्याचा कायदेशीर खटला हा पुणे किंवा मुंबईतच चालतो. मात्र, आता करण्यात आलेल्या दुरुस्तीनुसार ज्या बँकेत चेक वटवण्यासाठी जमा केला आणि तो वटला नाही त्या ठिकाणच्या न्यायालयातच चेक बाऊन्सप्रकरणी दाद मागता येईल. 
सध्या देशभरातील वेगवेगळ्या न्यायालयात चेक बाऊन्स प्रकरणांचे म्हणजे निगोशिएबल इन्स्ट्रमेंटेशन अँक्ट अंतर्गत तब्बल १८ लाख लोकांचे खटले दाखल आहेत. 
केंद्र सरकारने आज जारी केलेल्या अध्यादेशामुळे अशा तब्बल १८ लाख चेक बाऊन्स पीडितांना दिलासा मिळाला आहे. केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी या अध्यादेशाची माहिती दिली. यापूर्वी २०१४ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या एका निकालानुसार ज्या ठिकाणाहून चेक जारी केला असेल, त्या ठिकाणीच चेक बाऊन्सप्रकरणी कारवाई व्हायला हवी. पण, सरकारने आज घेतलेल्या निर्णयामुळे सर्वोच्च न्यायालयाचा आदेशही रद्द होईल.