Whats new

ब्रह्मपुत्रा नदीवर साकारतोय आशियातील सर्वात मोठा पूल

 

ईशान्य भारतासाठी उघडणार विकासाचे महाद्वार

चीनच्या लष्करी आव्हानाचा मुकाबला करण्यासाठी सक्षम

अरुणाचल प्रदेशाला लागून असलेल्या आपल्या हद्दीत चीन रस्त्यांचे आणि पुलांचे जाळे विणत आपले लष्करी सामर्थ्य वाढवत भारताच्या सुरक्षेला गंभीर धोका निर्माण करीत असताना त्याला प्रत्युत्तर म्हणून भारतानेही सीमावर्ती भागात रस्ते आणि पुलाची कामे हाती घेतली आहेत. याचाच एक भाग म्हणून ब्रह्मपुत्रा नदीवर आशियातील सर्वात मोठा पुल बांधण्याचे काम प्रगतिपथावर आहे.

सव्वा नऊ किमी लांबीचा हा पूल आसाम आणि अरुणाचल प्रदेश यांना जोडण्याचे काम तर करणार आहेच, शिवाय देशाची सीमा अखंड आणि सुरक्षित ठेवण्यातही आपले योगदान देणार आहे. आसाममधील ढोला या गावापासून सुरू होणारा हा पूल अरुणाचल प्रदेशातील सदियापर्यत जाणार आहे. या दोन गावांना जोडणारे रस्ते पकडून पुलाची प्रत्यक्ष लांबी २५ किमी आहे. यात नदीवरील प्रत्यक्ष पूलच सव्वा नऊ किमीचा आहे. हा भारतातीलच नाही तर आशिया खंडातील सर्वात मोठा पूल मानला जात आहे. या पुलाने बिहारची राजधानी पाटण्यात गंगा नदीवर असलेल्या गांधीसेतू या पुलालाही मागे टाकले आहे. या पुलाने या दोन राज्यांतील लोकांची मोठी सोय होणार असून, देशाच्या सुरक्षेलाही त्याचा हातभार लागणार आहे.

सध्या ढोला गावातून जवळपास ३०० किमीचे अंतर कापून सदियाला जावे लागते. त्यातही ब्रह्मपुत्रा नदी ओलांडावी लागते. पावसाळ्यात नदीला पूर आला, तर या दोन गावांचा पर्यायाने दोन राज्यांचा संपर्क तुटत होता. त्यामुळे या भागातील लोकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत होता. विशेष म्हणजे, आणिबाणीच्या परिस्थितीत लष्करही आसाममधून अरुणाचलमध्ये सहजासहजी पोहोचू शकत नव्हते. आता हा पूल होत असल्यामुळे लष्करी वाहनांना अरुणाचल प्रदेशमध्ये जाणे सहज शक्य होणार आहे. आधी जे अंतर कापण्यासाठी जवळपास दहा ते बारा तास लागत होते, आता त्याच अंतरासाठी फक्त दोन तास लागणार आहेत. यामुळे वेळेची आणि पैशाचीही मोठी बचत होणार आहे.

या पुलाच्या कामाचा एकूण खर्च ८७६ कोटी रुपये आहे. देशात अन्यत्र नदीवर पूल बांधणे आणि ब्रह्मपुत्रा नदीवर पूल बांधणे यात खूप फरक आहे. ब्रह्मपुत्रा नदीवर पूल बांधणे हे एक मोठे आव्हान असून, अभियांत्रिकी कौशल्याचाही यात कस लागत असतो. कारण, बह्मपुत्रा ही अतिशय आक्राळविक्राळ अशी नदी आहे. दरवर्षी पावसाळ्यात या नदीला पूर येतो आणि त्यात मोठ्या प्रमाणात संपत्ती व प्राणहानी होत असते. त्यामुळे त्या अर्थाने या नदीला आसामची जीवनदायिनी नाही, तर जीवनहारिणी नदी म्हणून ओळखले जाते. या नदीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, ही नदी दरवर्षी आपले पात्र बदलत असते. त्यामुळे या पुलाच्या नकाशात आणि बांधकामात अनेक वेळा बदल करावा लागला. मात्र, अभियंत्यांनी हे आव्हान यशस्वीपणे स्वीकारले आणि आसाम आणि अरुणाचल यांना जोडणारा हा पूल आता पूर्णत्वाच्या दिशेने वाटचाल करीत आहे.

< < Prev Next >>