Whats new

संत्र्याच्या उत्पादनात महाराष्ट्र नवव्या स्थानी

 

काही वर्षांपूर्वी संत्र्याच्या सर्वाधिक बागा आणि उत्पादन घेणाऱ्या महाराष्ट्रातील संत्र्याची अवस्था आता अत्यंत बिकट झाली असून उत्पादकतेच्या बाबतीत महाराष्ट्राची नवव्या स्थानी घसरण झाली आहे. फलोत्पादन विभागाने नुकतीच २०१३-१४ या वर्षातील संत्र्याचे उत्पादन आणि उत्पादकता जाहीर केली आहे, त्यातून हे कटू वास्तव समोर आले आहे.
देशातील १५ राज्यांमध्ये संत्री उत्पादन घेतले जाते. त्यातही कर्नाटक, पंजाब, राजस्थान, मध्यप्रदेश, आसाम, पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्र हे प्रमुख उत्पादक प्रदेश आहेत. देशात सर्वाधिक संत्रा बागा महाराष्ट्रात असल्या, तरी उत्पादन आणि उत्पादनाच्या बाबतीत महाराष्ट्र तळाशी आले आहे. २०१२-१३ या वर्षांच्या तुनलेत संत्रा उत्पादकतेत झालेली सुधारणा हे एकमेव समाधान फलोत्पादन विभागाला आहे. राज्यात २०१२-१३ वर्षात १ लाख ३३ हजार हेक्टर क्षेत्रात संत्रा बागांचे क्षेत्र होते. वर्षभरात ३ लाख ७० हजार मेट्रिक टन संत्र्याचे उत्पादन झाले. आणि उत्पादकता होती २.७८ मे. टन प्रति हेक्टर. दुसऱ्या वर्षी म्हणजे २०१३-१४ मध्ये उत्पादकता सुधारली. एकूण १ लाख ३५ हजार हेक्टर क्षेत्रात संत्र्याच्या झाडांची लागवड होती, त्यातून ७ लाख ४२ हजार ५०० मे. टन संत्र्याचे उत्पादन झाले आणि उत्पादकता ५.५० मे. टन प्रति हेक्टर इतकी नोंदवली गेली.