Whats new

मंगळावरील जीवसृष्टीचे रहस्य काचेत बंद

 

मंगळावर जीवसृष्टी आहे का याचा शोध निरंतर सुरू आहे. एका नव्या अभ्यासात शास्त्रज्ञांनी मंगळावर कधीकाळी जीवसृष्टी होती का याचा शोध सापडलेल्या काचेच्या तुकड्यांवरून घ्यायचा प्रयत्न चालविला आहे. मंगळावरील खड्ड्यात काचेचे तुकडे मिळाले आहेत. नासाच्या मंगळाभोवती फिरणाऱ्या आर्बिटर यानाने या काचांच्या साठ्याची छायाचित्रे पाठवली आहेत. या काचा म्हणजे मंगळावरील जीवनाचा आरसा मानला जात आहे. ग्रहावर जेव्हा उल्कापात होताना जो आघात होतो, त्यातील भाजून काढणाऱ्या उष्णतेमुळे तेथील खडकांचे काचेत रूपांतर होते, असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.

या काचेमध्ये सेंद्रिय अणू आणि वनस्पतींचा अंश कायमस्वरूपी बंद होतो. अशी क्रिया पृथ्वीवरही घडते, असे हा अभ्यास म्हणतो. ब्राऊन विद्यापीठातील शास्त्रज्ञ पीटर शुल्झ यांनी केलेल्या अभ्यासानुसार अर्जेंटिना येथे लक्षावधी वर्षापूर्वी अशाच प्रक्रियेने तयार झालेल्या काचांचे तुकडे सापडले असून, त्यात काही दुर्मिळ वनस्पती अडकलेल्या दिसत आहेत.