Whats new

महामानवाच्या लंडनमधील निवासस्थानाची भारताकडून 40 कोटी रुपयांना खरेदी

 

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या लंडनमधील निवासस्थानाच्या खरेदीची औपचारिक प्रक्रिया पूर्ण झाली आहे. भारत सरकारने ही वास्तू 40 कोटी रुपयांना खरेदी केली आहे. 

विद्यार्थीदशेमध्ये असताना 1920 च्या दशकात डॉ. आंबेडकरांचे या घरामध्ये वास्तव्य होते. येथील "लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स” या संस्थेमध्ये त्यांनी उच्च शिक्षण घेतले होते. ब्रिटनमधील भारतीय उच्चायुक्तांनी या वास्तूच्या खरेदीला दुजोरा दिला आहे. महाराष्ट्र शासनाने हे निवासस्थान खरेदी करण्याची तयारी दर्शविल्यानंतर या प्रक्रियेला वेग आला होता.

निवासस्थान खरेदीची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्राचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांच्या नेतृत्वाखालील तीन सदस्यांचे शिष्टमंडळ एप्रिल महिन्यातच ब्रिटनच्या दौऱ्यावर गेले होते. दरम्यान, आंबेडकरांच्या निवासस्थानासाठी खर्च केली जाणारी रक्काम महाराष्ट्र सरकारकडूनच दिली जाऊ शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

अधिकृतपणे निवासस्थान ताब्यात आल्यानंतर त्याची डागडुजी केली जाणार असून, त्यानंतर ते सर्वसामान्य लोकांसाठी खुले करण्यात येईल. ब्रिटनमध्ये उच्च शिक्षणासाठी जाणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांना या वास्तूमधील पहिला मजला तात्पुरता निवारा म्हणून उपलब्ध करुन देण्याचा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन आहे.