Whats new

रामदेव बाबांच्या 'पुत्र जीवक'वर बंदी

योगगुरू रामदेव बाबा यांच्या वादग्रस्त पुत्र जीवक या औषधाप्रकरणी वादंग सुरू झाल्यानंतर या औषधावर बंदी घालण्याचे आदेश शिवराज सिंह यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पक्षाच्या मध्य प्रदेश सरकारने दिले आहेत. जोपर्यंत या औषधाचे नाव बदलले जात नाही तोपर्यंत या औषधाची विक्री करू नये, असे आदेश दिले आहेत.

काही दिवसांपूर्वीच मुलगा होण्यासाठी बाबा रामदेव यांच्या औषध कंपनीतून पुत्र जीवक बीज नावाचे औषध विकले जात असल्याचा आरोप जनता दल युनायटेडचे खासदार के. सी. त्यागी यांनी केला होता. त्यागी यांनी या औषधाची पाकिटेही राज्यसभेत दाखवली होती. या औषधाची केवळ राज्यामध्येच विक्री करण्याची परवानगी दिली होती. दरम्यान, राज्यसभेतील विरोधी पक्षांनी पुत्र जीवक या औषधावर आक्षेप घेत हा मुद्दा राज्यसभेत उपस्थित केला होता. सर्व स्तरातून होत असलेला विरोध लक्षात घेत पतंजली योगपीठाने हे औषध केवळ स्त्रियांसाठी असून, त्याद्वारे कोणत्याही प्रकारे लिंगनिदान होत नसल्याचे स्पष्ट केले होते. या प्रकरणावरून रामदेव बाबा यांच्यावर जोरदार टीकेची झोड उठवण्यात आली होती. याप्रकरणी कडक कारवाई करण्याची मागणी विरोधकांकडून सुरू आहे, मात्र रामदेव यांनी हे आरोप फेटाळून लावले होते. ज्या खासदारांना आयुर्वेदाचे ज्ञान नाही त्यांनी लाज बाळगली पाहिजे आणि माफीही मागितली पाहिजे. त्या औषधाच्या पाकिटावर पुत्रप्राप्तीसाठीचे औषध असे कुठेही लिहिलेले नाही, असे रामदेव बाबांनी सांगितले होते.

< < Prev Next >>