Whats new

भारतात ४० हजार टन धान्य वाया

 

देशात दुष्काळाच्या छायेची भीती वर्तवली जात असताना आणि लाखो लोकांचे रोज पूर्ण उदरभरण अवघड असताना, भारतीय अन्न महामंडळाच्या गोदामात गेल्या दोन वर्षांत चाळीस हजार टनांचे धान्य सडून वाया गेले आहे. वादळ, पूर यामुळे हे नुकसान झाले असले तरी अन्न महामंडळाकडे धान्य साठवण्यासाठी सुरक्षित जागा नाही, तसेच वाहतुकीच्या वेळीही धान्यगळती वाढली आहे. माहिती अधिकारात ही गोष्ट उघड झाली आहे. २०१३ मध्ये महालेखापरीक्षकांनी अन्न महामंडळाच्या धान्य गोदामांचा पर्दाफाश एका अहवालात केला होता व तो संसदेतही मांडण्यात आला होता.

नासधूस किती?

भारतीय अन्न महामंडळाने दिलेल्या उत्तरानुसार २०१०-११ मध्ये ६३४६ टन, २०१४-१५ मध्ये १८८४७.२२ टन, तर २०११-१२ मध्ये ३३३८.०१ टन व २०१२-१३ मध्ये ३१४८.४४ टन, २०१३-१४ मध्ये २४६९५.४५ टन धान्य वाया गेले आहे. एकूण ५६००० टन धान्य वाया गेले असून त्यात २७ हजार टन तांदूळ, २६ हजार टन गहू यांचा समावेश आहे. २०१४-१५ मध्ये ओरिसात ७१०८ टन धान्य वाया गेले, कारण तेथे फायलिन वादळाने तडाखा दिला होता. जम्मू-काश्मीरमध्ये ६१२० टन धान्य वाया गेले, कारण तेथे सप्टेंबर २०१४ मध्ये पूर आला होता. आंध्र प्रदेशात २०१४-१५ मध्ये २२६२ टन, तर कर्नाटकात ७४७ टन अन्नधान्य वाया गेले. पश्चिम बंगालमध्ये २०१३-१४ मध्ये १२५३९ टन, तर बिहारमध्ये ३९०९.४०८ टन धान्य वाया गेले.

उपासमार किती?

संयुक्तराष्ट्रांच्या भूक अहवालानुसार भारतात भुकेल्या लोकांची संख्या १९.४ कोटी आहे. १ जूनअखेर अन्न महामंडळाकडे ५६८.३४ लाख टन अन्नधान्य साठा आहे.

माजी मंत्री के. व्ही. थॉमस यांच्या मते अन्नधान्य वाया जाण्याचे प्रमाण २०१० मध्ये २.५ टक्केकमी झाले, तर २०१३ मध्ये ते खरेदीच्या ०.०७ टक्केकमी झाले.

ग्राहक संरक्षण कायदा

हा अन्न महामंडळाच्या गोदामांना लागू नाही, त्यामुळे धान्य विक्रीनंतरच तक्रार दाखल करता येते. अन्नधान्य महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी अन्नधान्य वाया जात असल्यास कठोर कारवाई करण्याची गरज असून, वेळोवेळी गोदामांची तपासणी आवश्यक आहे.