Whats new

केर्न इंडिया अखेर वेदांता समूहात विलीन

 

देशातील सर्वात मोठय़ा नैसर्गिक साधनसंपत्ती निर्माण कंपनीचे अस्तित्व रविवारी केन इंडिया व मुख्य प्रवर्तक वेदांता समूह यांच्यातील एकत्रिकरणामुळे शक्य झाले. समभाग खरेदी-विक्री व्यवहाराच्या रुपाने याबाबतचा २.३ अब्ज डॉलरचा करार मुंबईत पार पडला. मात्र कर तिढय़ावरून समूहावरील चिंतेचे मळभ अद्यापही कायम आहेत. व्होडाफोन, रॉयल डच शेल आदी कंपन्यांही भारताच्या कर मागणीला त्रस्त आहेत.

केर्न इंडियाच्या भागधारकांना प्रत्येकी वेदांताचा दर्शनी मूल्य १० रुपयांचा समभाग मिळणार आहे. जारी करण्यात आलेले समभाग मूल्य केर्न इंडियाच्या शुक्रवारच्या बंद भावापेक्षा ७.३ टक्के अधिक आहे. वेदांतावर सध्या ७७,७७२ कोटी रुपयांच्या कर्जाचा भार आहे. केर्नच्या विलिनीकरणामुळे १६,८६७ कोटींची रोकड उभी राहिली आहे. विलिनीकरणानंतर वेदांतामधील वेदांता रिसोर्सेसचा हिस्सा ६२.९ टक्क्य़ांवरून आता ५०.१ टक्क्य़ांवर आली आहे.

समूहाने २०१३ मध्ये सेसा गोवा व स्टरलाईट इंडस्ट्रिजचे आपल्यात विलिनीकरण करून घेतले. समूहातील हिंदुस्थान झिंक या अन्य सूचिबद्ध कंपनीचेही विलिनीकरण होण्याची शक्यता आहे. वेदांता सामील झालेली केर्न इंडिया सध्या सरकारकडून मागणी केलेल्या २०,४९५ कोटी रुपयांच्या फेऱ्यात अडकली आहे. केर्न एनर्जीमार्फत कंपनीला भांडवली नफा झाल्याचे कारण देत ही कर मागणी करण्यात आली आहे.