Whats new

सार्कमधील तीन देशांमध्ये मोटार वाहन करारावर स्वाक्षरी

 

भारताने सार्क देशांमधील भूतान, बांगलादेश आणि नेपाळबरोबर वाहतूक करारावर सहय़ा केल्या आहेत. त्यामुळे या तिन्ही देशांमध्ये एकाच परवान्याने प्रवासी कार आणि मालवाहतूक गाडय़ा नेता येणार आहेत. लवकरच भारत म्यानमार आणि थायलंडशी असा करार करणार आहे, त्यामुळे दक्षिण आशियायी देशांशी व्यापार करणे सोपे जाणार आहे.

भारत, बांगलादेश, भूतान आणि नेपाळ यांच्यात झालेल्या मोटार वाहन करारावर (एमव्हीए) वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी भूतानची राजधानी थिम्पू येथे सही केली. यावेळी अन्य तिन्ही देशाचे वाहतूकमंत्री उपस्थित होते. म्यानमार आणि थायलंड अशाप्रकारच्या करारावर सहय़ा करण्यासाठी राजी झाले आहेत. नव्या करारामुळे वाहतूक खर्चात फक्त कपात होणार नाही तर आंतरराष्ट्रीय पातळीवरील वाहतूक व्यवस्था, प्रवाशांसाठी सोई-सुविधा, दळणवळण आणि चार देशांतील संबंध सुधारण्यास मदत होणार आहे.

नवीन करारामुळे आपल्या देशात परवाना असलेली वाहने या तीन देशांत मुक्तपणे प्रवास करू शकतात. चारही देशांत शांतता, सुव्यवस्था आणि समृद्धी निर्माण होण्यास मदत होणार आहे, असे वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी बोलताना सांगितले.