Whats new

मंगळसदृश स्थितीतून संशोधक आठ महिन्यांनी बाहेर

 

मंगळसदृश स्थिती असलेल्या हवाईतील मृत ज्वालामुखीतून मंगळावर जाण्याचा सराव करणारे सहा वैज्ञानिक बाहेर आले. त्यांना तेथे वेगळे ठेवून मंगळावरील वास्तव्याची तालीम घेण्यात आली. मौना लोआ या आठ हजार फूट उंचीवरील ज्वालामुखीच्या उतारावरील खोल ठिकाणातून ते आठ महिन्यांनी बाहेर आले व आज खुल्या हवेचा आनंद घेतला. प्रथमच त्यांनी स्पेस सूट घातलेला नव्हता. आतमध्ये असताना त्यांनी स्पेस सूट घातलेला होता. नासाच्या समानव मंगळ मोहिमेचे सदस्य असलेल्या वैज्ञानिकांवर कॅमेरे, ट्रॅकर्स व इलेक्ट्रॉनिक यंत्रांनी लक्ष ठेवले जात होते, त्यांच्यावर त्या ठिकाणी काय परिणाम जाणवतात हे बघितले जात होते.

जोसेलिन डन यांनी सांगितले, की बाहेर आल्यानंतर खुल्या हवेचा स्पर्श फार आनंददायक वाटला. आम्ही प्रवेशद्वाराजवळ आलो तेव्हा सूट नसल्याने भीती वाटत होती. आम्ही बराच काळ मंगळसदृश स्थितीत राहण्याचा सराव केला. ज्वालामुखीच्या घुमटाकार भागात हवा नसताना व मंगळासारख्या स्थितीत आम्ही वास्तव्य केले. आम्ही त्या घुमटाकार वास्तव्य ठिकाणातून छोटय़ा छिद्रासारख्या खिडक्यातून बाहेर बघत असून तेव्हा लाव्हारसाने बनलेली जमीन, डोंगर दिसत होते, असे हवाई विद्यापीठाचे प्राध्यापक किम बिनस्टेड यांनी सांगितले. या संशोधकांच्या भावना व एकूणच शारीरिक कामगिरीवर अशा वेगळ्या स्थितीत काय परिणाम होतो याचा अभ्यास ट्रॅकर्सच्या मदतीने करण्यात आला. त्यांना संदेशवहनात अडचणी येतात का, त्यांना नैराश्य येते का याचा अभ्यास करण्यात आला. अवकाशवीर हे सहनशील असतात, ते त्यांचे प्रश्न सांगत नाहीत, त्यामुळे खरे प्रश्न निर्माण झाले तर अडचणी येऊ शकतात म्हणून त्यांना येणाऱ्या अडचणींचा अभ्यास करण्यात आला.

आठ महिने ते मृत ज्वालामुखीच्या पोटात राहत होते. अगदी कमी जागेत सहा जणांना ठेवण्यात आले होते. ते तेथे व्यायाम व योग करीत होते. सौर ऊर्जेवरील ट्रेडमील व स्थिर बाइक वापरण्याची त्यांना सूर्यप्रकाशित दुपारीच परवानगी होती. त्यांना पोहण्याची सुविधाही होती. कलिंगड व काही विशिष्ट फळे उपलब्ध करून दिली होती.

'जेव्हा सूर्यप्रकाशित दिवस असायचा तेव्हा मजा यायची, मित्र एकमेकांबरोबर बसून आनंद लुटायचो पण जर दिवसा उजेड नसेल, तर त्या मर्यादित जागेत खूप उदासवाणे वाटायचे, तुम्ही बाहेर जाऊ शकत नाही. चालू शकत नाही, त्याचा खूप त्रास व्हायचा,' प्रत्येकाचा अनुभव तोच होता असे डन यांनी सांगितले.