Whats new

अति श्रीमंतांच्या यादीत भारत चौथ्या स्थानी

 

अमेरिकेचे अव्वलस्थान कायम, ‘बोस्टन कंसल्टिंग ग्रुप’चा अहवाल सादर

भारत 10 कोटी डॉलर किंवा त्यापेक्षा अति श्रीमंत असणाऱ्या (अल्ट्रा-हाय नेट वर्थ) कुटुंबांच्या संख्येत जागतिक स्तरावर चौथ्या स्थानी पोहचला असून या यादीत अमेरिका अग्रस्थानी विराजमान आहे. ‘बोस्टन कंसल्टिंग ग्रुप’च्या एका अहवालात याबाबतची माहिती प्रसिद्ध करण्यात आली. या अहवालानुसार भारत आणि चीन यांची अर्थव्यवस्थेतील वृद्धी कायम असल्याने येथील धनाढय़ांच्या संख्येत वाढ झाली.

अहवालानुसार, मागील वर्षी अमेरिकेमध्ये ‘अल्ट्रा-हाय नेट वर्थ’ असणाऱ्या कुटुंबांची संख्या 5302 एवढी होती. यानंतर चीन(1037), ब्रिटन(1019), भारत (928) आणि जर्मनी (679) यांचा क्रमांक आहे. भारतातील धनाढय़ांची संख्या 2013 च्या (284) तुलनेत एका वर्षात तिपटीने वाढली. तसेच आशिया-पॅसिफिक क्षेत्रात खासगी संपत्ती 2014 मध्ये 29 टक्क्यांनी वाढून 47 हजार अब्ज डॉलरवर पोहचली. यामुळे आशियाई क्षेत्र युरोपला (पूर्व-पश्चिम) मागे टाकून जगातील दुसऱ्या क्रमांकांचे सर्वात श्रीमंत शहर बनले. या अहवालानुसार, आशिया-पॅसिफिक (जपान सोडून) 2016 मध्ये 57 हजार अब्ज डॉलर खासगी संपत्ती सहित उत्तर अमेरिकेला मागे टाकेल. तसेच आशिया-पॅसिफिक क्षेत्रात खासगी संपत्ती 2019 पर्यंत वाढून 75 हजार अब्ज डॉलर होईल. यामध्ये सर्वात मोठी हिस्सेदारी भारत आणि चीन या महासत्तांची असेल.

या अहवालानुसार, अति श्रीमंतांच्या यादीत 97 भारतीय कुटुंबीयांनी प्रवेश केला आहे. यामध्ये प्रामुख्याने डाबर ग्रुप, पी.व्ही. रामप्रसाद रेड्डी (अरबिंदो फार्मा), नितीन संदीसारा, विवेक चाँद सेहगल (मदरसन सुमी सिस्टीम), नस्ली वाडिया (बॉम्बे डाईंग आणि ब्रिटानिया इंडस्ट्रीज) यांचा समावेश आहे.