Whats new

भारतीय रुपयाच्या मूल्यात पुन्हा घसरण

विदेशी गुंतवणूकदार संस्थांनी भारतीय शेअर बाजारांतील गुंतवणूक नफावसुलीसाठी काढून घेण्याची प्रक्रिया सुरू केल्यामुळे मागील काही आठवड्यांपासून डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाच्या मूल्यात घसरण सुरू झाली आहे. यामुळे भारतीय रुपया मागील साडेतीन महिन्यांच्या निचांकी पातळीवर घसरला आहे. मंगळवारीदेखील रुपया ६३.४६ पातळीवर बंद झाला.

गुरुवारच्या सत्रात परकीय चलनविनिमय बाजारात डॉलर्सची मागणी वाढल्यामुळे रुपया ५१ पैसे घसरून ६३.३२ पातळीपर्यंत कमजोर झाला होता. ८ जानेवारी २0१५ नंतर प्रथमच रुपयाने ६३ची पातळी ओलांडली आहे. सोमवारी रुपया ६२.८९ पातळीपर्यंत वधारला होता; पण दिवसअखेरीस डॉलर्सची मागणी वाढल्याने पुन्हा ६३.३४ पातळीवर बंद झाला. अमेरिकी बाजारात घरांची विक्री वाढल्याची आकडेवारी प्रसिद्ध झाल्यापासून डॉलरच्या मागणीत वाढ झाली आहे. तसेच एप्रिल महिन्याच्या अखेरीस निर्यातदारांकडून डॉलरच्या मागणीत वाढ झाली आहे. यामुळे रुपयावर दबाव आला असून त्याची घसरण सुरू झाली आहे. इंडिया फॉरेक्स या चलनविनिमय व्यापारातील कंपनीचे कार्यकारी अधिकारी अभिषेक गोयंका यांनी रुपयाचे मूल्य ६१.९0 ते ६३.९0 दरम्यान राहील, असा अंदाज व्यक्त केला आहे. फेडरेशन ऑफ इंडियन एक्स्पोर्ट ऑर्गनायझेशन या संस्थेने चालू आर्थिक वर्षात २0१५-१६मध्ये भारताची निर्यात ३00 अब्ज डॉलर्स पातळी गाठण्याची शक्यता नसल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. निर्यातीत मंदी आली तर रुपयाच्या मूल्यावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. तसेच चीनच्या निर्मिती क्षेत्रातील मंदीचा परिणामदेखील भारतीय रुपयावर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

< < Prev Next >>