Whats new

भारताच्या 'झेपावे उत्तरेकडे'चे गूढ उकलले

भारतीय भूभाग वेगाने सरकण्याचे कारण दोन भूस्तर हालचालींमध्ये असल्याचा शोध

युरेशिया भूखंडाला सुमारे आठ कोटी वर्षांपूर्वी दोन भूस्तर हालचालींमुळे खंडीय वेगाचा नवीन विक्रम भारताने प्रस्थापित केल्याचा दावा अमेरिकेतील "एमआयटी‘ या संस्थेने केलेल्या एका अभ्यासानंतर करण्यात आला आहे. या संशोधनामुळे भारत युरेशियाला इतक्‍या वेगाने का धडकला, या प्रश्‍नाची उकल झाल्याची शक्‍यता व्यक्त होत आहे. भूस्तरीय हालचालींमध्ये भारताच्या नावावर अनेक चमत्कारीक विक्रम असल्याचेही या संस्थेने प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटले आहे.

भूगर्भावरील आवरणावर असलेल्या भागात दोन भूस्तर एकमेकांना धडकून एक भूस्तर दुसऱ्याला धडकून आवरणात घुसतात. अशा दोन भूस्तर हालचालींच्या प्रभावामुळे भारत उत्तरेकडे अधिक वेगाने सरकल्याचे मॅसेच्युसेट्‌स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजी (एमआयटी) या संस्थेतील भूगर्भ शास्त्रज्ञांनी शोधून काढले आहे. एखादा भूस्तर आवरणाखाली जात असताना तो त्याच्याशी संलग्न असलेला भूभाग ओढून घेतो. असे दोन भूस्तर आवरणाखाली गेल्याने भारताचा उत्तरेकडे सरकण्याचा वेग दुपटीने वाढला. शास्त्रज्ञांच्या गटाला हिमालयातील खडकांचा अभ्यास करून दोन भूस्तर हालचाली झाल्याचे पुरावेही मिळाल्यानंतर त्यांनी अभ्यास करून दोन भूस्तर हालचालींचा निष्कर्ष काढला.

गोंडवानापासून युरेशियाकडे वाटचाल

सुमारे 14 कोटी वर्षांपूर्वी भारत हा गोंडवाना भूखंडाचा भाग होता. हा गोंडवाना भूखंड दक्षिण गोलार्धात होता. 12 कोटी वर्षांपूर्वी ज्याला आता भारत म्हणतात, तो भूभाग गोंडवानापासून तुटून उत्तरेकडे सरकण्यास सुरवात झाली. साधारणपणे प्रत्येक वर्षाला 5 सेंटिमीटर या वेगाने त्याची हालचाल होत होती. त्यानंतर सुमारे 8 कोटी वर्षांपूर्वी अचानक वेग घेऊन हा भूभाग प्रतिवर्ष 15 सेंटिमीटर या वेगाने उत्तरेकडे सरकू लागला. सध्या होत असलेल्या आंतरस्तरीय हालचालींपेक्षा हा वेग दुप्पट होता. यानंतर सुमारे पाच कोटी वर्षांपूर्वी हा भाग युरेशियाला धडकून हिमालयाची निर्मिती झाली. भारत उत्तरेकडे इतक्‍या वेगाने सरकण्याचे कारण शोधण्यासाठी संशोधक गेली अनेक वर्षे धडपडत होते.

< < Prev Next >>