Whats new

10 डॉलर्सच्या नोटेवर महिलेची छबी झळकणार

 

अमेरिकेत महिलांना मतदानाचा अधिकार प्राप्त झाल्याच्या शताब्दी वर्षी नोट बाजारात येणार.

डॉलरच्या नोटेवर नामवंत महिलेचे चित्र असण्याबद्दल अमेरिकेत वाढती मागणी आहे. त्यामुळे कोषागार विभागाने लवकरच दहा डॉलर्सच्या नोटेवर महिलेचे चित्र छापण्याचे जाहीर केले आहे. कोषागार विभागाचे सचिव जेकब जे. लिऊ यांनी नियमाप्रमाणे नामवंत महिलेची निवड करून तिचे नाव वर्षअखेरीस जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे. महिलायुक्त नोट 2020 च्या मानाने दिसेल. स्त्रियांना अमेरिकेत मताधिकार प्राप्त झाल्याचा 19 व्या दुरुस्तीचे ते शताब्दी वर्ष  आहे.

निवडलेली महिला मृत असली पाहिजे, असा नियम आहे. अमेरिकन लोकशाहीमध्ये जुने टाकून नव्याचा पुरस्कार करणाऱ्या हॅरिएट टबमनला 20 डॉलर्सच्या नोटेवर स्थान मिळण्याची मागणी समाजाकडून होत आहे. नाण्यापेक्षा नोटेवर महिलेला स्थान मिळणे दीर्घ काळाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. यापूर्वी 1979 ते 1981 च्या काळात सुसान बी. अँथोनीला चांदीच्या डॉलरवरती स्थान मिळाले होते. तसेच 1999 मध्ये लुईस आणि क्लार्क यांच्या मोहिमेत मार्गदर्शिकेचे काम करणाऱया साकागावीची निवड होऊन तिच्या छबीने 2000 पासून सोन्याच्या डॉलरवर स्थान मिळविले होते. परंतु दोन्ही नाणी लोकप्रिय न झाल्याने त्यांचे उत्पादन काही काळानंतर थांबविण्यात आले होते.

1929 पासून प्रतिमेच्या दृष्टीने बदल नसला तरी रंग व रेषा या रचना स्वरुपात दर दहा वर्षांनी बदल करण्यात येतो. यामागे बनावट नोटांना प्रतिबंध बसावा हे कारण आहे. नवीन 10 डॉलर्स नोटेच्या रचनासंदर्भात लिऊ आणि त्यांच्या अधिकाऱ्यांनी लोकांच्या कल्पना चर्चा करण्यासाठी मागविल्या आहेत. नजर कमकुवत असणाऱ्यांना स्पर्शाद्वारे नोट ओळखण्याची वैशिष्टय़ेही सदर नोटेमध्ये अंतर्भूत करण्यात येणार आहेत.