Whats new

मनुष्य डायनोसॉरच्या मार्गाने?

 

आंतरराष्ट्रीय अभ्यासकांचा संपूर्ण विनाशाचा इशारा

पृथ्वीवरून विविध प्रजाती नष्ट होण्याचा वेग सामान्य वेगापेक्षा १०० पटीने वाढला असून त्यामुळे पृथ्वीवरील जीवसृष्टी सहाव्यांदा पूर्णपणे नष्ट होण्याच्या (मास एक्सिंक्शन) दिशेने वाटचाल सुरू झाली आहे. या संपूर्ण महाविनाशाच्या प्रक्रियेमध्ये मनुष्यजात हा प्रारंभीचा बळी ठरू शकतो, असा इशारा एका नवीन अभ्यासाने नुकताच दिला आहे.

विश्वात आतापर्यंत पाच ज्ञात महाविनाश घडून गेले आहेत. यातील ६.६ कोटी वर्षांपूर्वी झालेल्या शेवटच्या, पाचव्या महाविनाशामुळे पृथ्वीवरून डायनोसॉरच्या प्रजाती नामशेष झाल्या. तेव्हापासून प्रजाती नष्ट होण्याचा वेग सध्या कधी नव्हे एवढा वाढला असल्याचा इशारा स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटी, प्रिन्स्टन युनिव्हर्सिटी आणि कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीच्या अभ्यासकांनी दिला आहे. एवढेच नव्हे, तर विनाशाचा हा वेग असाच कायम राहू दिला, तर येत्या तीन पिढ्यांच्या आतच त्याचा मनुष्यजातीला फटका बसलेला दिसेल, असेही या अभ्यासकांनी स्पष्ट केले आहे. 'सायन्स अॅडव्हान्सेस' या जर्नलमध्ये हा अभ्यास प्रसिद्ध झाला आहे.

'आपण आता सहाव्या महाविनाशाच्या प्रक्रियेमध्ये प्रवेश केला आहे, हे अभ्यासाअंती स्पष्ट झाले आहे,' अशी माहिती स्टॅनफोर्ड वूड्स इन्स्टिट्यूट फॉर द एनव्हायर्नमेंटचे वरिष्ठ संशोधक पॉल एहर्लिच यांनी दिली. 'मनुष्यप्राणी हा डायनोसॉरच्या मार्गाने जात आहे... हा महाविनाश रोखला नाही, तर पृथ्वीवर पुन्हा जीवसृष्टी बहरण्यासाठी कोट्यवधी वर्षे लागतील,' असा इशारा या अभ्यासाचे मुख्य संशोधक जेरार्डो सेबालॉस यांनी दिला. अवशेषांचे तपशील आणि अन्य अनेक पुराव्यांआधारे संशोधकांनी हा निष्कर्ष मांडला आहे.

सन १०९९ पासून पृष्ठवंशीय प्राण्यांच्या ४०० हून अधिक प्रजाती नामशेष झाल्या आहेत. यामध्ये ६९ सस्तन, ८० पक्षी, २४ सरपटणारे प्राणी, १४६ उभयचर आणि १५८ माशांच्या प्रजातींचा समावेश आहे. इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर या संस्थेच्या माहितीनुसार, सध्या अस्तित्वात असलेल्या प्रजातींपैकी उभयचरांच्या ४१ टक्के आणि सस्तन प्राण्यांच्या २६ टक्के प्रजाती नामशेष होण्याचा धोका आहे.

जीवांच्या प्रजाती नामशेष होण्यामुळे परिसंस्थेचा तोल ढासळतो. माशांमुळे होणारे पिकांचे फलन तसेच अन्य जीवांमुळे पाणथळ जागांमधील पाण्याचे शुद्धीकरण अशी अनेक अत्यावश्यक कामे हे जीव बजावत असतात. मात्र ही जैवविविधताच नष्ट झाल्याने तीन पिढ्यांच्या आतच मनुष्याच्या आयुष्यावर याचा परिणाम होईल, असे संशोधकांनी म्हटले आहे.

हे रोखण्यासाठी आधीच धोक्यात असलेल्या प्रजातींच्या संवर्धनासाठी वेगवान, केंद्रीत प्रयत्न आवश्यक असून अधिवास नष्ट होणे, आर्थिक फायद्यासाठी अतिवापर आणि हवामानबदल यांचा या प्रजातींवर होणारा परिणाम रोखण्याची गरज आहे, यावर या अभ्यासाने भर दिला आहे.