Whats new

टेटे "टॉप हंड्रेड'मध्ये प्रथमच दोन भारतीय

भारताचा टेबलटेनिसपटू अचंता शरथ कमल याने जागतिक क्रमवारीत 12 क्रमांक प्रगती करीत 32 वे स्थान गाठले. सौम्यजीत घोषनेही नऊ क्रमांक प्रगती करीत 95वे स्थान मिळविले. यामुळे इतिहासात प्रथमच भारताचे दोन खेळाडू "टॉप हंड्रेड‘मध्ये आले आहेत.

शरथचा हा कारकिर्दीतील सर्वोत्तम क्रमांक आहे. शरथने जागतिक स्पर्धेत तिसरी फेरी गाठली होती, पण कंबरेच्या दुखापतीमुळे त्याला माघार घ्यावी लागली. अनुभवी शरथ यंदाच्या मोसमात चांगल्या फॉर्मात आहे. त्याने जयपूरमधील आशियाई स्पर्धेत पहिल्या 20 मधील दोन स्पर्धकांना हरविले. त्याने गेल्या महिन्यात 56 गुणांची कमाई केली. त्याचे 2296 गुण झाले. यापूर्वी गेल्या वर्षी मे महिन्यात त्याने 38व्या क्रमांकापर्यंत मजल मारली होती.

सौम्यजीत जागतिक स्पर्धेत दुसरी फेरी गाठली होती. जी. साथीयन याने पात्रता फेरीतून मुख्य ड्रॉमध्ये स्थान मिळविले होते. त्याने तब्बल 26 क्रमांक प्रगती करीत 162 वे स्थान मिळविले. हरमीत देसाई आठ क्रमांक घसरण होऊन 167 व्या स्थानावर गेला. सनील शेट्टी 242 वा आहे.

महिलांमध्ये मौमा दासने सातने प्रगती करीत 164 वे, तर पौलमी घटकने 13 ने प्रगती करीत 182 वे स्थान गाठले. के. शामिनी 202 वी आहे. ठाण्याच्या मधुरीका पाटकरने 13 ने प्रगती करीत 213 वे स्थान गाठले. 

< < Prev Next >>