Whats new

इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रावर छायाचित्रही दिसणार

 

सहा राज्यांतील पोटनिवडणुकांमध्ये नव्या पद्धतीचा वापर, निवडणूक आयोगाची माहिती

नावातील साधर्म्यामुळे मतदारांचा होणारा गोंधळ टाळण्यासाठी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रावर (ईव्हीएम) यापुढे निवडणुकीतील उमेदवाराच्या छायाचित्रासह पक्षाचे नाव आणि चिन्ह दर्शविण्यात येणार आहे. केरळ, मध्य प्रदेश, मेघालय, तमिळनाडू आणि त्रिपुरा या राज्यांतील सहा विधानसभा मतदारसंघात पोट-निवडणुका होत आहेत. 27 जून रोजी होत असलेल्या या पोटनिवडणुकीमध्ये नव्या पद्धतीची रचना असलेल्या मतदान यंत्रांचा वापर केला जाणार आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रावर उमेदवाराचे नाव आणि पक्षचिन्हासोबतच उमेदवाराच्या छायाचित्राचा वापर करण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला असल्याचे आयोगाचे सचिव के. एन. भार यांनी सांगितले. उमेदवाराचे नाव आणि पक्षचिन्ह यांच्यामध्ये छायाचित्र वापरले जाणार आहे. येथून पुढे होणाऱ्या सर्व लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये छायाचित्राचा समावेश असलेल्या ‘ईव्हीएम’चा वापर करण्यात येणार आहे, असे भार म्हणाले. उमेदवारांची मोठी यादी, नावातील साधर्म्य आदींमुळे मतदारांचा गोंधळ होतो. हा गोंधळ टाळून योग्य उमेदवाराची निवड करणे मतदारांना सुलभ व्हावे, या साठी नव्या पद्धतीच्या ‘ईव्हीएम’मुळे मदत मिळणार असल्याचे आयोगाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.