Whats new

‘नालसर’ने दिली पहिली लिंग ओळखमुक्त पदवी

 

हैदराबाद स्थित नालसर विधि विद्यापीठाने पदवीच्या एका विद्यार्थिनीला लिंग ओळखमुक्त अशी पदवी प्रदान केली. या पदवीत विद्यार्थिनीच्या नावासमोर ‘मिस’ नव्हे तर ‘एमएक्स’ असे लिहिलेले आहे. देशातील एखाद्या विद्यापीठाने जारी केलेली अशा प्रकारची ही पहिली पदवी आहे. नालसर विधि विद्यापीठातून कायद्याची पदवी प्राप्त करणारी आनंदिता मुखर्जी हिच्या विनंतीस मान देऊन विद्यापीठाने तिला ही पदवी प्रदान केली. पदवी प्रमाणपत्रावरील आपल्या नावासमोर ‘कुमारी/श्रीमती’ किंवा ‘श्री वा श्रीमान’ असे कुठलेही लिंगाची ओळख दर्शविणारे संबोधन वा उपाधी न लिहिता ‘एमएक्स’ लिहावे, अशी विनंती आनंदिता हिने केली होती. तिची ही विनंती मान्य करून विद्यापीठाने ‘एमएक्स आनंदिता मुखर्जी’ या नावाने तिला पदवी प्रमाणपत्र बहाल केले.

आनंदिता हिला स्वत:साठी ‘तो’ (पुल्लिंग) वा ती (स्त्रीलिंग) याऐवजी ‘ते’(इंग्रजीत ‘दे’) असे संबोधन लावणे आवडते. आपल्या पदवी प्रमाणपत्रात माझ्या लिंग लिहिण्याची वा त्याची ओळख दर्शविण्याची गरज नाही, असे तिला वाटले आणि म्हणून विद्यापीठास तिने तशी विनंती केली. एमएक्स हे लिंग ओळखमुक्त असे संबोधन आहे. याप्रती अलीकडे आकर्षण वाढायला लागले आहे.