Whats new

चीनने कैलास मानसरोवर यात्रेसाठी खुला केला नथुला खिंडीतील मार्ग

 

चीनने कैलास मानसरोवर यात्रेला जाण्यासाठी दुसरा मार्ग खुला केला असून हा मार्ग तिबेटमार्गे नथुला खिंडीतून जातो. चीन व भारत यांच्यातील मैत्रीअंतर्गत विश्वासनिर्मितीसाठी चीनचा हा एक उपाय आहे.

हिमालयातील सिक्कीम नथुला मार्ग समुद्र सपाटीपासून ४ हजार मीटरवर आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चीन दौऱ्यात हा मार्ग खुला करण्याची घोषणा करण्यात आली होती. यामुळे कैलास मानसरोवर यात्रेसाठी अधिक भारतीय यात्रेकरू जाऊ शकतील. सध्याचा मार्ग लिपुलकेश खिंडीतून जात असून, २०१३ साली उत्तराखंडात आलेल्या भीषण पुरात हा मार्ग खराब व नादुरुस्त झाला आहे.

सिक्कीमच्या सीमेवरून ४४ भारतीय यात्रेकरू या मार्गावरून पुढे गेले. चिनी अधिकाऱ्यांनी तिबेटमध्ये त्यांचे स्वागत केले. रविवारी चीनचे भारतातील राजदूत ले येचुंग भारतीय सीमेवरून प्रथमच या मार्गावर आले. या मार्गावर येणारे ते पहिले चिनी अधिकारी ठरले.

चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी कैलास यात्रेसाठी नवा मार्ग सुरू करण्याचे आश्वासन दिले होते. जिनपिंग भारत दौऱ्यावर आले होते तेव्हापासून या प्रस्तावावर चर्चा सुरू होती. उत्तराखंड व नेपाळमार्गे कैलासकडे जाणारा मार्ग नैसर्गिक रचनेमुळे अवघड आहे, या मार्गावर बराच प्रवास खेचराच्या पाठीवर बसून करावा लागतो. याची कल्पना असल्याने पंतप्रधान मोदी यांनी कैलास यात्रेसाठी दुसऱ्या मार्गाचा प्रस्ताव मांडला होता.