Whats new

पोलिओ निर्मूलनासाठी पाकला मदतीचा हात

पोलिओच्या विरोधात निकराचा लढा देण्यासाठी संयुक्त मोहीम राबविण्यासाठी अफगाणिस्तान आणि पाकिस्तानला भारताने मदतीचा हात देऊ केला असल्याची माहिती सरकारतर्फे राज्यसभेत देण्यात आली.

पोलिओचे समूळ उच्चाटन करण्यात भारताला यश आले आहे. मात्र भारताचे शेजारी राष्ट्र असलेल्या अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमध्ये अद्यापही पोलिओचे रुग्ण आढळलेले आहेत. 22 एप्रिल 2015 पर्यंत पाकिस्तानात पोलिओचे 21 रुग्ण आढळले असून, अफगाणिस्तानात एक रुग्ण सापडला आहे. मागील वर्षी पाकिस्तानात 306, तर अफगाणिस्तानात 21 पोलिओचे रुग्ण सापडले होते.

राज्यसभेत लेखी उत्तरात केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांनी ही माहिती दिली. पोलिओ समूळ नष्ट करण्यासाठी पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या दोन्ही देशांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. भारतातील पोलिओ उच्चाटनाच्या मॉडेलचा अभ्यास करण्यासाठी दोन्ही देश विशेष पथके पाठविणार आहेत, असे ही नड्डा यांनी स्पष्ट केले. "सार्क‘च्या सदस्य असलेल्या भारतासह बहुतेक राष्ट्रांना पोलिओचे उच्चाटन करण्यात यश मिळाले आहे.

पाकिस्तान आणि अफगाणिस्तान मात्र याबाबत अद्यापही मागे आहे. त्यामुळे या राष्ट्रांमधून जोपर्यंत पोलिओच्या विषाणूचे उच्चाटन होत तोपर्यंत त्यांच्या शेजारील राष्ट्रांनाही पोलिओचा धोका कायम राहणार आहे. भारताला याचा सर्वाधिक फटका बसू शकतो. त्यामुळे या शेजारील राष्ट्रांना पोलिओ मुक्त करण्यासाठी सरकार मदत करण्यास तयार असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. 

  < < Prev Next >>