Whats new

नारंगने जिंकले विश्वकपमध्ये कांस्य

भारतीय नेमबाज गगन नारंग याने अमेरिकेतील फोर्ट बेनिंग येथे सुरू असलेल्या आयएसएसएफ विश्वकपच्या ५० मीटर रायफल प्रोन स्पर्धेत कांस्यपदक जिंकले आणि २०१६ मध्ये होणाऱ्या रिओ ऑलिम्पिकसाठी कोटा प्राप्त केला.

लंडन ऑलिम्पिकमध्ये दहा मीटर एअर रायफलमध्ये कांस्यपदक जिंकणाऱ्या नारंगने एकूण १८५.८ गुण मिळवून तिसरे स्थान मिळवले. अमेरिकेच्या मायकल मॅकफॅल (२०८.८) याने सुवर्ण तर नॉर्वेच्या ओले क्रिस्टियन ब्राइन (२०६.३) याने रौप्यपदक जिंकले. या स्पर्धेतील अन्य कोटा स्थान मॅकफॅल याला मिळाले.

त्याआधी या स्पर्धेत नारंग आणि भारताचा एकमेव ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता अभिनव बिंद्रा १0 मीटर एअर रायफलमध्ये पात्र ठरण्यात अपयशी ठरले.

नारंग रियोसाठी पात्र ठरणारा तिसरा नेमबाज आहे. त्याआधी जीतू राय आणि अपूर्वी चंदेला यांनी ऑलिम्पिक कोटा स्थान मिळवले होते. चंदेलाने गेल्या महिन्यात कोरियात विश्वकपमध्ये दहा मीटर रायफलमध्ये कांस्यपदक जिंकताना कोटा स्थान प्राप्त केले होते.

पिस्टल नेमबाज जीतू राय याने गेल्या वर्षी स्पेनच्या ग्रेनाडात विश्व चॅम्पियनशिपमध्ये भारताला पहिला ऑलिम्पिक कोटा स्थान मिळवून दिले होते. त्याने त्या वेळेस ५० मी. फ्री पिस्टलमध्ये रौप्यपदक जिंकले होते.