Whats new

अंतराळात ३३ दिवसांत उगवली भाजी

Bhaji  

अंतराळात प्रथमच भाजी उगवली असून, ती अंतराळवीर खाणार असल्याची घटनाही प्रथमच घडत आहे. पृथ्वीभोवती फिरणाऱ्या प्रयोगशाळेत लेट्युस लावले होते. त्याची वाढ झाली असून, रेड रोमाईन लेट्युस सोमवारी खाण्यास तयार झाले आहे. अंतराळात उगवलेल्या भाज्यांची चव कशी आहे हे अंतराळवीर सोमवारी पाहणार आहेत. ही भाजी खाण्याआधी अंतराळवीर ती सायट्रिक आम्लाचा वापर करून स्वच्छ धुतील. यातील अर्धा गड्डा अंतराळवीर खाण्यासाठी वापरतील व अर्धा गड्डा फ्रीजमध्ये ठेवला जाईल. पृथ्वीवर परतल्यानंतर त्याची तपासणी केली जाईल. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरील सहा अंतराळवीरांना ही भाजी वाढविण्यासाठी ३३ दिवस लागले आहेत. नासाचे वनस्पती तज्ज्ञ व्हेज-०१ या नावाने या प्रयोगाला ओळखतात. त्यांनी अंतराळात बियाणाच्या पिशव्या पाठवून ही भाजी लावली आणि नंतर तिच्या वाढीवर लक्षही ठेवले. बियाणांच्या पिशव्या मॅडीसन येथील आॅर्बिटल टेक्नॉलॉजी कॉर्पोरेशनने तयार केल्या असून, अंतराळात पाठविण्यापूर्वी केनेडी अंतराळ केंद्रात त्याची तपासणी झाली आहे. अंतराळात लेट्युस भाजीची एक व झिनिया फुलांची एक अशा दोन बियाणाच्या पिशव्या पाठविण्यात आल्या आहेत. अंतराळस्थानकावरील भाजी कक्षात लाल, निळे व हिरवे एलईडी लाईट लावण्यात आले आहेत. यामुळे रोपे वाढण्यास मदत होते. लाल व निळे दिवे जास्त प्रकाश फेकतात. त्यामुळे रोपे फिकट जांभळी दिसतात. हिरवा प्रकाश झाडांना हिरवा रंग देण्याचे काम करतो. या पद्धतीने अंतराळात टोमॅटो , ब्लू बेरी व लेट्युस या भाज्या लावण्यात येणार असून, ताज्या भाज्यामुळे अंतराळवीरांचे मनोधैर्य सकारात्मक राहण्यास मदत होणार आहे.