Whats new

एच१बी व्हिसा मिळणाऱ्यांमध्ये ८६ टक्के भारतीय

H1B  

अमेरिकेकडून ज्यांना एच१बी व्हिसा दिला जातो त्यांमध्ये ८६ टक्के कम्प्युटर क्षेत्रात काम करणारे भारतीय आहेत, असे अमेरिकन सरकारने प्रसिद्ध केलेल्या नव्या माहितीवरून स्पष्ट झाले आहे. यातील बहुसंख्य कर्मचारी हे इन्फोसिस किंवा टाटा कन्स्ल्टन्सीसारख्या आऊटसोर्सिंग कंपन्यांसाठी काम करतात. या यादीत चीन हा भारताच्या बराच मागे असून चिनी नागरिकांना ५ टक्के एच१बी व्हिसा प्रदान केले जातात. जगातील अन्य कुठल्याही देशांतील एक टक्क्यांहून अधिक नागरिकांना हा व्हिसा दिला जात नसल्याचे यूएस सिटिझन्स अँड इमिग्रेशन सर्व्हिसेसच्या आकडेवारीवरून स्पष्ट होते. २०१४ मध्ये तब्बल ८६ हजार एचवनबी व्हिसा अमेरिकेकडून देण्यात आले.
कमी कालावधीसाठी अशा प्रकारचे प्रोग्रामर्सना निमंत्रित करणे हे आऊटसोर्सिंग करणाऱ्या कंपन्यांना अधिक सोपे जाते कारण अमेरिकन नागरिकांना त्या जागेसाठी अपेक्षित असणाऱ्या वेतनापेक्षा कितीतरी कमी वेतन भारतीयांना दिले जाते. हे प्रोग्रामर भारतात परतल्यानंतर कंपनीच्या क्लाएंट्सना अधिक चांगल्या प्रकारे सेवा देऊ शकतात. सकम्प्युटरशिवाय अन्य क्षेत्रांतही भारतीयांना व्हिसा मिळण्याचे प्रमाण अधिक आहे.

एच१बी व्हिसा काय आहे?
परदेशी नागरिकांना अमेरिकेत तात्पुरत्या स्वरूपात काम करण्यास परवानगी देणारा हा व्हिसा असून काही विशिष्ट व्यवसायांसाठी तो दिला जातो. या व्हिसाखाली संबंधित व्यक्ती जास्तीत जास्त सहा वर्षांसाठी काम करू शकते. विशेष कारणांसाठी तो आणखी तीन वर्षे वाढवता येतो.