Whats new

११ पेमेंट बँकांना हिरवा कंदिल

bank  

ऑनलाईन खरेदी सुलभ व्हावी, याकरिता ज्येष्ठ बँकर नचिकेत मोर यांच्या समितीने मांडलेल्या पेमेंट बँकेच्या संकल्पनेची व्याप्ती वाढत असून, भारतीय रिझर्व्ह बँकेने ११ कंपन्यांना पेमेंट बँक म्हणून तत्त्वत: मंजुरी दिली आहे.
मंजुरी मिळालेल्या पेमेंट बँकांमध्ये एअरटेल, व्होडाफोन, रिलायन्स, आदीत् बिर्ला नुव्हो, चोलामंडलम, भारतीय टपाल विभाग, फिनो पे टेक, एनएसडीएल, टेक महिन्द्रा, सनफार्मा, पेटीएम, आदी कंपन्यांचा समावेश आहे. पेमेंट बँकेचा परवाना मिळावा म्हणून सुमारे ४१ बँकांनी मंजुरीसाठी अर्ज केला होता. भारतीय रिझर्व्ह बँकेने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकानुसार, या कंपन्यांना १८ महिने कालावधीकरिता तत्वत: मंजुरी दिली असून या कालावधीत जर या कंपन्यांची कामगिरी समाधानकारक असेल तर त्यांना अधिक काळासाठी पुढील परवाना देण्यात येईल. पेमेंट बँकेची मंजुरी मिळालेल्या कंपन्यांना एक लाख रुपयांपर्यंतची रक्कम स्वीकारता येईल.

पेमेंट बँक म्हणजे काय ?
सध्या विविध व्यवहार ऑनलाईन होत आहेत अथवा कार्डाच्या माध्यमातून व्यवहार वाढीस लागत आहेत. अशावेळी अधिकाधिक कॅश लेस व्यवहारांच्या माध्यमातून व्यवस्थेत पैसा यावा या हेतूने पेमेंट बँकेची संकल्पना मांडण्यात आली. यानुसार, ऑनलाईन अथवा कार्डावरून करण्यात येणाऱ्या व्यवहारांसाठी जी तांत्रिक उभारणी अथवा व्यवस्था लागते त्याची उभारणी खाजगी कंपन्यांतर्फे केली जाते. ग्राहकाला स्वत:च्या नियमित बँकेतील पैसे या पेमेंट बँकेच्या खात्यात भरून त्याद्वारे आॅनलाईन अथवा कार्डावरून व्यवहार करता येतात.
या व्यवहारांकडे ‘प्रीपेड’ व्यवहाराचे एक माध्यम म्हणून देखील बघता येईल. पेमेंट बँकेतील खात्यात जमा पैशांवर कोणत्याही प्रकारचे व्याज मिळत नाही. अथवा या बँका कोणलाही कर्जाऊ रक्कम देऊ शकत नाहीत. उदाहरणाने सांगायचे तर, एखाद्या व्यक्तीला ऑनलाईन अथवा कार्डाच्या माध्यमातून व्यवहार करायचे असतील तर तो या पेमेंट बँकांकडे नोंदणी करून खाते सुरू करू शकतो.या खात्यात पैसे जमा करून त्याद्वारे व्यवहार करू शकतो. पेमेंट बँका आपल्या ग्राहकांना डेबिट कार्ड देखील जारी करू शकतात.