Whats new

स्मार्ट सिटी योजनेत महाराष्ट्रातील 10 शहर, देशातील 98 शहरांची यादी जाहीर

SMART CITY  

स्मार्ट सिटी योजनेत समाविष्ट झालेल्या 100 पैकी 98 शहरांची यादी केंद्रीय नगरविकास मंत्री व्यंकय्या नायडू यांनी जाहीर केली. या यादीत महाराष्ट्रातील दहा शहरांची नावं आहेत.मध्ये मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याण- डोंबिवली, नाशिक, पुणे, औरंगाबाद, अमरावती, नागपूर आणि सोलापूर यांचा समावेश आहे. या यादीत उत्तर प्रदेशातील सर्वाधिक 13 शहरं आहेत. 'स्मार्ट सिटी' ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महत्त्वकांक्षी योजना आहे. स्मार्ट सिटीअंतर्गत देशभरातील शहरांचा कायापालट केला जाणार आहे. या योजनेतून शहरांच्या विकासाबरोबरच रोजगारात मोठी वाढ होईल, असा विश्वास पंतप्रधान मोदींना आहे.

स्मार्ट शहरांवर 48 हजार कोटी खर्च
देशातील 100 स्मार्ट सिटीवर पुढील पाच वर्षात तब्बल 48 हजार कोटी खर्च अपेक्षित आहे. पहिल्या टप्प्यात 20 शहरं आणि दुसऱ्या टप्प्यात 80 शहरं 'स्मार्ट' करण्यात येतील. चार स्मार्ट सिटींच्या शहरांची लोकसंख्या 50 लाखांहून अधिक असेल. सरकारने आज जाहीर केलेल्या 98 शहरांच्या यादीत 24 राजधान्यांचा समावेश आहे. 'स्मार्ट सिटी' योजनेत राज्य आणि केंद्र सरकारचा वाटा 50-50 टक्क्यांचा असेल.

कोणत्या राज्यातील किती शहरं?
स्मार्ट सिटींच्या यादीत उत्तर प्रदेशातील सर्वाधिक 13 शहरांचा समावेश आहे. यानंतर तामिळनाडू 12, महाराष्ट्र 10, मध्य प्रदेश 7, गुजरात आणि कर्नाटक प्रत्येकी 6, राजस्थान आणि पश्चिम बंगाल प्रत्येकी 4, आंध्र, पंजाब आणि बिहारचे प्रत्येकी तीन शहरांचा समावेश आहे.