Whats new

युसेन बोल्टला ‘दुहेरी’ मुकुट

uasen bolt  

विश्वातील सर्वात वेगवान धावपटू जमैकाच्या युसेन बोल्टने 100 मीटरनंतर आता 200 मीटर शर्यतीतही आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध करून दाखविले. येथे सुरू असलेल्या विश्व ऍथलेटिक्स स्पर्धेत बोल्टने त्याचा कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या अमेरिकेच्या जस्टिन गॅटलिनला मागे टाकत 200 मी.चे सुवर्णपदक पटकावताना या वर्षातील सर्वात जलद वेळही नोंदवली. पुरुषांच्या 400 मी. शर्यतीत नामांकित चॅम्पियन्सना चकित करीत दक्षिण आफ्रिकेच्या वेड व्हान नीकर्कने सुवर्णपदक पटकावले.

स्पर्धेत 200 मी. च्या अंतिम फेरीत बोल्टने गॅटलिनला हरवित सलग तिस-यांदा जेतेपद पटकावले. बोल्टने 19.55 सेकंदात शर्यत पूर्ण केली. रौप्य मिळविणा-या गॅटलिनने ही शर्यत पूर्ण करण्यासाठी 19.74 सेकंद अवधी घेतला. दक्षिण आफ्रिकेच्या अनास्को जोबोद्वानाने 19.87 से. वेळ नोंदवत कांस्यपदक मिळविले. पनामाच्या अलोन्सो एडवर्डने जोबोद्वानाइतकीच (19.861) वेळ नोंदवली. पण दोन सहस्रांश (19.863) सेकंदाने एडवर्ड मागे पडल्याने त्याला चौथे स्थान मिळाले. बर्लिनमध्ये झालेल्या स्पर्धेत बोल्टने या प्रकारातील 19.19 सेकंदाचा विश्वविक्रम नोंदवला होता. त्यानंतर द.कोरियातील देगू व रशियातील मॉस्को येथे झालेल्या विश्व अजिंक्यपद स्पर्धेतही त्याने सुवर्णपदके मिळविली होती. बोल्टचे हे विश्व ऍथलेटिक्स स्पर्धेतील एकूण दहावे सुवर्णपदक असून तो 100 मी. रिलेमध्येही भाग घेणार असल्याने 11 वे सुवर्ण मिळविण्याची त्याला संधी आहे.