Whats new

अर्जेटिनाच्या ‘एम्ब्रस ऑफ द सर्पेन्ट’ला सुवर्णमयूर 

 46 FILM FESTIVAL

गोव्याच्या 46 व्या आंतराराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात अर्जेटिनाच्या ‘एम्ब्रस ऑफ द सर्पेन्ट’ हा सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला असून त्याला सुवर्णमयूर किताब प्राप्त झाला आहे. पुढील दोन वर्षात आंचिमसाठी गोव्यात स्वतःची स्वतंत्र साधनसुविधा तयार होईल, अशी घोषणा मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी केली. देशातील जुने व प्राचीन असे त्याचबरोबर सर्वोत्कृष्ट अशा 1300 चित्रपटांचे डीजिटलायसेशन करण्यात येत असून आतापर्यंत 375 चित्रपटांचे काम पूर्ण झाल्याची माहिती केंद्रीय माहिती व प्रसारण राज्यमंत्री राजवर्धनसिंह राठोड यांनी दिली. आंचिम समारोप सोहळय़ात प्रमुख पाहुणे असलेल्या ए. आर. रहेमान यांची मात्र आयोजकांनी साफ निराशा केली.

फ्रान्सचे व्हिन्सेंट लिंडन उत्कृष्ट अभिनेते - आंतरराष्ट्रीय चित्रपट स्पर्धेत अर्जेटिनाचा एम्ब्रस ऑफ द सर्पेन्ट हा उत्कृष्ट चित्रपट ठरला व त्याला सुवर्णमयूर प्राप्त झाला. उत्कृष्ट अभिनेता म्हणून फ्रान्सच्या ‘द मेजर ऑफ अ मॅन’ चित्रपटातील व्हिन्सेंट लिंडन रुपेरी मयूरचे मानकरी ठरले.

पाच अभिनेत्रींना मिळाला उत्कृष्ट अभिनेत्रीचा मान - प्रख्यात दिग्दर्शक आणि परीक्षक मंडळाचे अध्यक्ष कबीर बेदी यांनी संपूर्ण निकाल जाहीर केला. उत्कृष्ट अभिनेत्रीच्या रुपेरी मयूरचा पुरस्कार ‘मुस्तांग’ या तुर्कीच्या चित्रपटातील पाच नायिकांना प्राप्त झाला. ग्युनिस सेंसॉय, देगबा दोगुस्लु इत्यादी नायिकांचा यात समावेश आहे. अशा तऱहेने एक पुरस्कार पाच जणींना प्राप्त होण्याची ही पहिलीच वेळ असावी. कबिर बेदी म्हणाले की, पाचही जणींनी उत्कृष्ट भूमिका केल्या आहेत. त्यामुळे त्यांचा विचार करणे भाग पडले आहे.

उत्कृष्ट दिग्दर्शनाचे पारितोषिक नेदरलँडच्या आईनस्टाईन ईन ग्वानाजुआतो’चे दिग्दर्शक पीरट ग्रीनडावे यांना प्राप्त झाला आहे. परीक्षकांचा खास पुरस्कार सील्ड कार्गोचे दिग्दर्शक जुलिया वर्गास यांना प्राप्त झाला, तर सर्बियन चित्रपट एन्क्लेव्ह या चित्रपटाला प्राप्त झाला.

निकिता मिखाल्कोव्ह यांना जीवनगौरव - रशियन चित्रपट अभिनेते व दिग्दर्शक निकिता मिखाल्कोव्ह यांना यावर्षीचा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात दिला जाणारा ‘जीवन गौरव’ पुरस्कार प्राप्त झाला. प्रख्यात संगीतकार ए. आर. रेहमान यांच्याहस्ते मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर व केंद्रीय माहिती राज्यमंत्री राजवर्धनसिंह राठोड यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. रौप्य मयूर व रुपये 10 लाख असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. सत्कारास उत्तर देताना मिखाल्कोव्ह यांनी आंचिम आयोजनाबद्दल व भारताबद्दल त्यांनी यावेळी गौरवोद्गार काढले.

Next >>