Whats new

अलेक पदमसी यांना तन्वीर सन्मान, तर प्रदीप मुळ्ये यांना नाट्यधर्मी पुरस्कार जाहीर

 ALEH

‘रूपवेध’ प्रतिष्ठानतर्फे गेली सहा दशके इंग्रजी रंगभूमी, चित्रपट आणि जाहिरात या तीनही क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविणारे ज्येष्ठ रंगकर्मी अलेक पद्मसी यांना यंदाचा ‘तन्वीर सन्मान’ जाहीर झाला आहे. एक लाख रुपये आणि स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

प्रसिद्ध नेपथ्यकार आणि प्रकाशयोजनाकार प्रदीप मुळ्ये यांना नाटय़धर्मी पुरस्कार जाहीर झाला असून ३० हजार रुपये आणि स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. रंगभूमी क्षेत्रात राष्ट्रीय स्तरावर महनीय कार्य केलेल्या व्यक्तींच्याप्रति कृतज्ञता व्यक्त करण्याच्या उद्देशातून प्रतिष्ठानतर्फे डॉ. श्रीराम लागू आणि दीपा श्रीराम यांचे पुत्र तन्वीर याच्या स्मृतिप्रीत्यर्थ हा पुरस्कार दिला जातो.

वयाच्या सातव्या वर्षी ‘द र्मचट ऑफ व्हेनिस’ नाटकापासून सुरुवात केलेल्या पदमसी यांनी ६० वर्षांत ७० इंग्रजी नाटकांतून भूमिका केल्या आहेत. मुंबईच्या नाटय़वर्तुळात ‘टेमिंग ऑफ द श्रू’ या नाटकापासून ते ‘शायद आपभी हँसे’ अशी अनेक उत्तमोत्तम नाटके त्यांनी केली. ‘द थिएटर ग्रुप’ या त्यांच्या संस्थेमार्फत पर्ल पदमसी, कबीर बेदी, सबीरा मर्चंट, शेरॉन प्रभाकर, दलीप साहिल असे अनेक कलाकार घडले. त्यांच्याच दिग्दर्शनाखाली स्मिता पाटील यांनी रंगभूमी पदार्पण केल्याचे म्हटले जाते. रिचर्ड अटेनबरो यांच्या ‘गांधी’ चित्रपटातील बॅ. जीना ही त्यांची भूमिका गाजली होती. शेक्सपिअर, आर्थर मिलर, टेनेसि विलियम्स या नाटककारांबरोबरच पद्मसी यांनी प्रताप शर्मा, विजय तेंडुलकर, गिरीश कर्नाड, रिफत शमीम आणि इस्मत चुगताई या भारतीय नाटककारांची नाटके केली.

प्रयोगशील आणि व्यावसायिक तत्त्वांवर उत्तम काम करणारा कलाकार अशी ख्याती असलेल्या प्रदीप मुळ्ये यांनी कलाकार आणि आविष्कार संस्थेतून काही नाटकांचे दिग्दर्शन केले आहे. ‘सारे प्रवासी घडीचे’, ‘इंदू काळे, सरला भोळे’, ‘ड्राय डे’, ‘राजा सिंह’ या नाटकांचे दिग्दर्शन, गो. नी. दांडेकर यांच्या ‘शितू’ कादंबरीवर आधारित चित्रपटाचे दिग्दर्शन ही त्यांची वैशिष्टय़े आहेत.

Next >>