Whats new

डीसीपी (मुख्यालय) पदावर मोरेश्वर आत्राम यांची वर्णी

 police

मागील ३३ दिवसांपासून रिक्त असलेल्या आयुक्तालयातील पोलिस उपायुक्त मुख्यालय या पदावर मोरेश्वर आत्राम यांची वर्णी लागली असून, ते लवकरच पदाची सूत्रे स्वीकारणार आहेत. राज्य शासनाच्या गृह विभागाने राज्यातील ३२ एसीपी, डीवायएसपी दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीची यादी जाहीर केली आहे. मोरेश्वर आत्राम हे सध्या नागपूर ग्रामीण पोलिस दलात सावनेर येथे एसडीपीओ म्हणून कार्यरत आहेत. पदोन्नतीमुळे ते आता पोलिस उपायुक्त झाले असून, त्यांची अमरावती आयुक्तालयात बदली झाली आहे. यापूर्वी वर्षे अमरावती शहरात त्यांनी काम केले आहे. अमरावतीवरून बदली झाल्यानंतर ते पदोन्नतीवर डीवायएसपी म्हणून नागपूरला गेले. नागपूरवरून नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा एसडीपीओ म्हणून चार वर्षे काम पाहिले. अक्कलकुवावरून सोलापूर शहरात एसीपी म्हणून गेले. त्या ठिकाणी दोन वर्षे वाहतूक शाखेला एसीपी म्हणून काम पाहिले, त्यानंतर मागील वर्षी ते नागपूर ग्रामीणला सावनेर एसडीपीओ म्हणून आले. तेव्हापासून सावनेरलाच ते कार्यरत होते. आजच्या पदोन्नतीवर बदलीमुळे ते आता अमरावती आयुक्तालयात पोलिस उपायुक्त पदावर येणार आहेत. सहा महिन्यांपूर्वी उपायुक्त मोनिका राऊत यांची बदली झाली ३१ ऑक्टोबरला पोलिस उपायुक्त बी. के. गावराने हे सेवानिवृत्त झाले. आत्राम यांनी पदभार स्वीकारल्यानंतरही एक पद रिक्तच राहणार आहे.

अमरावतीत यापूर्वीही दिली सेवा : १९८३साली पोलिस सेवेत दाखल झालेल्या आत्राम यांनी २००४ ते २००८ ही चार वर्षे अमरावती आयुक्तालयात सेवा दिली आहे. शहर कोतवाली आणि राजापेठ ठाण्याचे ठाणेदार म्हणून काम पाहिले होते. राजापेठला ठाणेदार असतानाच संपूर्ण राज्यात खळबळ उडवणाऱ्या 'साध्वी भस्म प्रकरण' प्रकरणाचा गुंता सोडवून सत्यता पुढे आणण्यासाठी आत्राम यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली होती.

Next >>