Whats new
Shopping Cart: Rs 0.00

You have no items in your shopping cart.

Subtotal: Rs 0.00

Welcome to

Allauddin

महावितरण उजाळणार २४ कोटींच्या योजनेतून घारापुरी बेट

 gharapuri bet

जागतिक पर्यटनस्थळ म्हणून नावारूपास आलेल्या घारापुरी लेण्यांचा अंधार आता कायमचा दूर होणार आहे. घारापुरी बेटासाठी महावितरण कंपनीने २४ कोटींच्या महत्त्वाकांक्षी योजनेचा आराखडा तयार केला आहे. खोल समुद्रातून वीजपुरवठा करणा-या विद्युतवाहिन्या टाकून बेटांना प्रकाशित केले जाणार आहे.

मुंबईपासून अवघ्या ११ किलोमीटर अंतरावर असलेले घारापुरी बेट हे जागतिक दर्जाचे पर्यटनस्थळ आहे. देशा-विदेशातील लाखो पर्यटक दर वर्षी या बेटाला भेट देत असतात. बेटावर २०० कुटुंबांचे कायम वास्तव्य असते. पण दिवसा पर्यटकांनी गजबजणारा हा परिसर रात्री काळोखाच्या साम्राज्यात हरवतो. ऐतिहासिक वारसा लाभलेल्या या बेटांना प्रकाशित करण्यासाठी सौर वीजनिर्मिती योजना कुचकामी ठरल्याने सध्या २० केवीच्या डिझेल जनरेटरवर काही तास वीजपुरवठा केला जातो. मात्र, रात्रीच्या वेळी डिझेल जनरेटर बंद ठेवण्यात येत असल्याने वीजपुरवठा खंडित असतो. चार दशकांच्या पाठपुराव्यानंतर आता घालापुरी लेणी प्रकाशित होण्याची चिन्ह दिसू लागली आहेत. महावितरणने घारापुरी बेटांसाठी २४ कोटींची वीजपुरवठा योजना तयार केली असून, निधीसाठी एमएमआरडीए आणि रायगड जिल्हा नियोजन मंडळाशी बोलणी सुरू आहे. या योजनेअंतर्गत न्हावा गावापासून घारापुरी बेटांपर्यंत समुद्राच्या आतून विद्युत वाहिनी (सबमरीन केबल) टाकली जाणार आहे. यासाठी आवश्यक टोपोग्राफी सव्र्हेही पूर्ण करण्यात आला आहे. न्हावा-शेवा खाडीतून जेएनपीटी बंदरासाठी वाहतूक होत असते. त्यामुळे समुद्रात टाकण्यात येणा-या विद्युत वाहिनीला धोका होऊ शकतो. ही बाब लक्षात घेऊन विद्युत वाहिनी भोवती सिमेंट शीटच्या जाळ्या बसवण्यात येणार आहेत. निधी उपलब्ध झाल्यानंतर तीन महिन्यांत हे काम पूर्ण होणे अपेक्षित असल्याचे महावितरणचे कार्यकारी अभियंता फजल खान यांनी सांगितले. घारापुरी बेटावर वीजपुरवठा योजनेसाठी लागणारा निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन ऊर्जामंत्री बावनकुळे यांनी दिले आहे.

Next >>