Whats new

ग्रंथ उद्योगात भारत जगात सहावा क्रमांकावर

  books

भारतात निरक्षरतेचे प्रमाण सर्वाधिक आहे किंवा हल्ली सोशल मीडियामुळे पुस्तक वाचनाचे प्रमाण कमी झाले आहे, अशा तक्रारी कायम होत असतात. मात्र, हा सूर चुकीचा असल्याचे ‘नेल्सन इंडिया मार्केट’ने केलेल्या पाहणीत दिसून आले. भारतातील पुस्तक बाजाराची उलाढाल 261 अब्ज रुपये आहे, ती 2020 पर्यंत 739 अब्ज रुपयांपर्यंत पोचेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. जागतिक पातळीवरील ग्रंथ बाजारपेठेत भारताचा सहावा क्रमांक आहे. आश्चर्याची बाब म्हणजे इंग्रजी पुस्तकांबाबत भारत दुस-या स्थानावर आहे.

‘असोसिएशन ऑफ पब्लिशर्स इन इंडिया’ आणि ‘द फेडरेशन ऑफ इंडियन पब्लिशर्स’ या दोन संघटनांनी ‘नेल्सन इंडिया बुक मार्केट रिपोर्ट 2015 : अंडरस्टॅंडिंग द इंडिया बुक मार्केट’ हा अहवाल सादर केला आहे. ग्रंथ बाजारातील संधी व आव्हाने तसेच भवितव्य या विषयीची पाहणी करण्यात आली. सुमारे दोन हजार वाचकांचा सर्व्हे यात करण्यात आला. त्यात शहरातील 18 वर्षांपुढील वाचकांचा समावेश होता. ग्रंथ उद्योगात सरकारची प्रत्यक्ष गुंतवणूक नाही, तरी पुढील पाच वर्षांत ग्रंथ उद्योगाचा वार्षिक विकासदर 19.3 टक्के असेल. पुस्तक प्रकाशन व विक्रीची विस्कळित व्यवस्था, संथ वितरण व्यवस्था आणि रोख रकमेची कमतरता, पायरसी ही आव्हाने प्रकाशकांपुढे आहेत, असे अहवालात म्हटले आहे.

भारतात इंग्रजी भाषेतील पुस्तके प्रकाशित करणारे नऊ हजार प्रकाशक आहेत, त्यामुळे भारताचा जगात दुसरा क्रमांक असल्याची माहितीही अहवालात दिली आहे. सध्याच्या ई जमान्यात देशातील 70 टक्के प्रकाशकांनी त्यांची पुस्तके ऑनलाइन उपलब्ध केली आहेत. ऑनलाइन उद्योगात पुस्तक विक्रीचा वाटा 15 टक्के आहे. इलेक्ट्रॉनिक्स वस्तू व कपड्यांच्या खरेदी- विक्रीनंतर पुस्तकांचाच क्रमांक लागतो, असेही पाहणीत दिसून आले आहे.

पाहणीतील निष्कर्ष -
· सर्वसाधारणपणे आठवड्यातून दोन वेळा वाचन केले जाते.
· 56 टक्के वाचक वर्षातून एकदा तीन-चार पुस्तकांची ऑनलाइन खरेदी करतात.
· इंग्रजी भाषेतील पुस्तकांची विक्री 55 टक्के, हिंदी पुस्तकांचा वाटा 35 टक्के.

Next >>