Whats new

‘इन्स्पायर-2015’ या राष्ट्रीय बालवैज्ञानिक प्रदर्शनात राज्यातील पाच बालवैज्ञानिकांना राष्ट्रीय सन्मान

 child

तालुका पातळीवरील शालेय विज्ञान प्रदर्शनातील एका शक्तिशाली मोटारवर चालणारी क्रेन पाहून मला वाटले, की आपल्या घरातील उपकरणांच्या मोटारींचाही वापर करून वीजपुरवठा करणारा छोटेखानी जनरेटर का तयार होऊ शकत नाही? मी त्या दृष्टीने घरच्या घरीच प्रयोग सुरू केले. एक दिवस तर मी जनरेटर तयार करण्यासाठी घरातील कुलरचीच मोटार काढून घेतली, तेव्हा घरच्यांची प्रचंड बोलणी मला खावी लागली... याच मिनी जनरेटरला राष्ट्रीय पातळीवर पुरस्कार मिळाल्याने मला जो आनंद झाला, तो मी बोलूनही दाखवू शकत नाही...’ केंद्र सरकारतर्फे राजधानीत आयोजित ‘इन्स्पायर-2015’ या राष्ट्रीय बालवैज्ञानिक प्रदर्शनात विजेता ठरलेला मालेगावच्या एल. आर. काबरा विद्यालयाचा सौरभ बागूल सांगत होता, तेव्हा त्याचा कंठ दाटून आला होता. या प्रदर्शनात यंदा महाराष्ट्राच्या पाच विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक शोधांना राष्ट्रीय सन्मान मिळाला.

दिल्ली आयआयटीच्या प्रशस्त आवारात भरलेल्या पाचव्या ‘इन्स्पायर-2015’ या बालवैज्ञानिक प्रदर्शनाची सांगता झाली. केंद्रीय विज्ञान-तंत्रज्ञानमंत्री डॉ. हर्षवर्धन, मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी यांनी देशभरातील 690 विद्यार्थ्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली. या वर्षी राष्ट्रीय पातळीवर निवडलेल्या 60 शोधांमध्ये महाराष्ट्राच्या पाच विद्यार्थ्यांच्या उपक्रमांचा समावेश आहे. सुवर्णपदक, प्रशस्तिपत्र व रोख रक्कम, असे या सन्मानाचे स्वरूप आहे. या विजेत्यांच्या शोधांची राष्ट्रीय पातळीवर स्पर्धा होऊन नंतर त्यातील निवडक शोध-उपकरणे आंतरराष्ट्रीय विज्ञान कॉंग्रेस या प्रदर्शनासाठी निवडली जाणार आहेत. राज्यातील यंदाच्या विजेत्यांची संख्या गतवर्षीपेक्षा जवळपास दुप्पट आहे.

कमीत कमी किमतीत समाजासाठी जास्तीत जास्त उपयुक्त वैज्ञानिक उपकरण बनविणे व ते बनविणा-या विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास या प्रमुख निकषांच्या आधारावर परीक्षकांनी या 60 राष्ट्रीय विजेत्यांची निवड केली. हे सारे बालवैज्ञानिक हे उद्याच्या भारताचे भवितव्य आहे. त्यांना आणखी संधी-प्रोत्साहन देणे ही शासन-संस्था-शाळा व कुटुंबीय यांची संयुक्त जबाबदारी आहे. राज्यातील 43 विद्यार्थ्यांच्या शोध प्रकल्पांची या वेळी राष्ट्रीय पातळीवर निवड झाली होती.

राज्यातील विजेत्यांमध्ये मालेगावच्या सौरभशिवाय मुंबईचा किरणकुमार शहा (सांडपाणी शुद्धीकरण करणारा रोबो), अमरावतीची दीपाली घुगे (कर्णबधिरांसाठी श्रवणयंत्र), सांगलीचा शुभम गोरे (इथाईल इथर बॉईल हे इंधन), क-हाडची हिंदवी तोडकर (इंजिन ऑइलचा फेरवापर) या विद्यार्थ्यांचाही समावश होता. सौरभच्या जनरेटरला पहिल्यांदा जिल्हा पातळीवर आग्रहाने पाठविणारे त्याचे शिक्षक माधुरी पाठक व महेश बागड यांचाही आनंद गगनात मावेनासा झाला होता.

या पाच जणांची निवड राष्ट्रीय पातळीवर झाली तरी राज्यातील पुण्याच्या विपुल नेहरेकर याचे, सौरऊर्जेवर गवत कापणारे यंत्र, नाशिकच्या मोईनुद्दीन पीरजादे याचे स्वयंचलित नियंत्रण यंत्रणा, लातूरच्या मिथिलेश हांडर्ले याचे जलप्रदूषण टाळण्यासाठी मानवी केसांची उपयुक्तता, आदित्य पोतदार (नंदुरबार) याचे अपघात सुरक्षा संयंत्र, जळगावच्या स्वरांगी एकतारे हिचे ओझोनच्या थराचे रक्षण, नारखेडच्या हृषीकेश वानखेडे याचे स्वयंचलित मतदानयंत्र, आदी उपकरणांनही उपस्थितांची दाद मिळविली.

>strong>परीक्षण पद्धतीवर मात्र आहे आक्षेप
राज्यातील अनेक शिक्षकांनी राष्ट्रीय पातळीवरील परीक्षण पद्धतीवर आक्षेप घेतला. प्रदर्शनाच्या उद्घाटनाच्या दिवशी मुलांचे प्रकल्प मांडूनही झाले नव्हते, तोच परीक्षकांचे जथे प्रदर्शनाच्या ठिकाणी आले. ही पाहणी करताना त्यांनी ठरावीक मॉडेल्सच निवडली. एकाच फेरीत परीक्षण करून थेट निकालच जाहीर केला, असे अनेक आक्षेप राज्यातील शिक्षकांनी नोंदवले. अशा प्रकारांमुळे हे छोटे विद्यार्थी नाराज होतात त्यामुळे राष्ट्रीय पातळीवर परीक्षणाची काटेकोर पद्धती असावी, अशी अपेक्षाही या शिक्षकांनी व्यक्त केली.

Next >>