Whats new

मराठमोळी वैदर्भीय कन्या डॉ. ईलाक्षी मोरे-गुप्ता बीजिंगमधील मिसेस वर्ल्ड स्पर्धेत उपविजेतेपद पटकावून रोवला अटकेपार झेंडा

  ilakshi

बीजिंगमधील मिसेस वर्ल्ड स्पर्धेत डॉ ईलाक्षी मोरे-गुप्ता या मराठमोळ्या वैदर्भीय कन्येने उपविजेतेपद पटकावून अटकेपार झेंडा रोवला आहे, सोबतच तिने ‘फेस ऑफ आशिया’ हा पुरस्कार स्वतंत्रपणे पटकावला. २६ नोव्हेंबर ते ४ डिसेंबरदरम्यान ही स्पर्धा बीजिंगमध्ये झाली. लेबनॉनच्या सौभाग्यवतीने पहिला, तर भारताच्या ईलाक्षीने द्वितीय स्थानावर मजल मारली. हा अत्यंत आनंदाचा क्षण असून भारताचे जागतिक पातळीवर प्रतिनिधित्व केल्याबद्दल अभिमान वाटतो, अशी सार्थ प्रतिक्रिया ईलाक्षीने बीजिंगवरून भ्रमणध्वनीद्वारे दिली. येथील हॉटेल व्यावसायिक शैलेंद्र गुप्ता यांची स्नुषा असलेली ईलाक्षी ही अकोला येथील डॉ. मीना व डॉ. शशिकांत मोरे यांची कन्या आहे. तिने बी.डी.एस. ही पदवी मेघे अभिमत विद्यापीठाच्या शरद पवार दंत महाविद्यालयातून २०१३ मध्ये घेतली. पुढे २०१४ मध्ये नागपूरच्या एन.के.जी साळवे वैद्यकीय महाविद्यालयातून पदव्युत्तर शिक्षण घेणारी ईलाक्षी तीन वर्षांपूर्वी डॉ.अनिकेत गुप्ता यांच्याशी विवाहबद्ध झाली. ती व तिचे पती पुण्याला जहांगीर हॉस्पिटलमध्ये कार्यरत आहेत. या स्पर्धेत ५३ देशांतील सौभाग्यवती सहभागी झाल्या होत्या. २६ नोव्हेंबरपासून विविध फे-या झाल्यावर पाच जणींची निवड झाली. पहिल्या तिघींना एक समान प्रश्न विचारण्यात आले. तुमचे आवडते फूल कोणते व का? यावर ईलाक्षीने तिचे कमळ हे आवडते फूल असल्याचे उत्तर दिले. केवळ राष्ट्रीय प्रतीक म्हणूनच नव्हे, तर कमळ हे पावित्र्यदर्शक फूल आहे. ते सकारात्मक संदेश देते. दलदलीत उगवते, पण कायम टवटवीत असते. माझा उगम नव्हे, तर फुलणे महत्त्वाचे, असा संदेश मला कमळातून दिसतो. या तिच्या उत्तरावर परीक्षकांचीही दाद मिळाली. गतवर्षी मिसेस इंडिया स्पर्धेत प्रथम आल्याने तिची जागतिक स्पर्धेसाठी निवड झाली. यापूर्वी २००१ मध्ये अदिती गोवित्रीकरने या अशा स्पर्धेत प्रथम पुरस्कार पटकावला होता.

Next >>