Whats new

दुर्धर व्याधीशी लढत अथर्व मारणेची ‘सुवर्ण’ भरारी

  suvarna padak

चालता आणि बोलता येत नाही, बौद्धिक क्षमताही तुलनेने खूप कमी असे मूल असल्यास पालकांसाठी ती चिंतेची बाब ठरते. अशा मुलांची समाजाकडून हेटाळणी तरी होते किंवा सहानुभूती तरी मिळते. मात्र, आपल्यातील या व्यंग्यावर मात करत कष्ट आणि जिद्दीच्या जोरावर एका विद्यार्थ्याने राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत सुवर्णपदकासह तीन पदके पटकावली आहेत. अथर्व घनश्याम मारणे (वय 14, रा. बिबवेवाडी) असे त्याचे नाव आहे. बेळगाव येथे नुकत्याच झालेल्या पंधराव्या राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत त्याने ही चमकदार कामगिरी केली आहे. अथर्वला जन्मजात सेरेब्रल पाल्सी हा विकार आहे. त्याला चालता व बोलता येत नाही. चाकांच्या खुर्चीवर बसून सर्व व्यवहार करणारा अथर्व पाण्यात उतरल्यावर मात्र माशाच्या चपळाईशी स्पर्धा करतो. गेल्या सहा वर्षांमध्ये त्याने विविध स्तरांवरील जलतरण स्पर्धांमध्ये भाग घेऊन 15 पदके पटकावली आहेत. त्यात तीन राष्ट्रीय व तीन राज्यस्तरावरील पदकांचा समावेश आहे.

रोज पोहण्याचा व्यायाम केल्यानंतर अथर्वच्या शरीराला त्याचा फायदा होईल व चालण्यास मदत होईल, असा सल्ला वैद्यकीय क्षेत्रातील एका तज्ज्ञाने त्याच्या आई-वडिलांना दिला. त्यानुसार उपचाराचा एक भाग म्हणून त्याला जलतरण तलावावर नेण्यात आले. काही दिवसांतच त्याला पोहण्याची आवड निर्माण झाली व तो दीड-दोन तास पाण्यात राहू लागला. त्यानंतर अनेक स्पर्धांमध्ये तो आपली चमक दाखवू लागला. 2013 मध्ये मुंबईत झालेल्या राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत त्याला सुवर्णपदक मिळाले. इंदूरमध्ये झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत त्याला ब्रॉंझपदक मिळाले. बेळगाव येथे होणा-या राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक मिळवायचेच, हे उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवून तो रोज चार-पाच तास कसून सराव करू लागला. सुदैवानं त्याच्या मेहनतीला व जिद्दीला यशाचे फळ मिळाले आणि या स्पर्धेत सुवर्णपदकासह तीन पदके त्याला मिळाली.

सहकारनगरमधील जलतरण तलावावर सध्या तो कसून सराव करतो. या यशात त्याचे वडील घनश्याम, आई अर्चना, प्रशिक्षक अभिजित तांबे, बालकल्याण संस्था व जागृती शाळा यांचा सिंहाचा वाटा आहे.

Next >>